Bangladesh Tragedy : बांगलादेशात पुन्हा हिंदू टार्गेटवर? निवृत्त शिक्षक, पत्नी अन् दोन मुलांचे आढळले मृतदेह

रंगपूर शहरात धक्कादायक घटना, गुप्‍तचर विभागाकडून तपास सुरु
bangladesh-hindu-family-found-dead-rangpur
Published on
Updated on

bangladesh hindu family found dead rangpur

बांगलादेशातील रंगपूर शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका बंद घरात निवृत्त हिंदू शिक्षक, त्यांची पत्नी, मुलगी आणि १२ वर्षांच्या मुलाचे संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आले आहेत. एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

बंद घराचे कुलूप तोडून मृतदेह बाहेर काढले

ही घटना रंगपूर शहरातील दासपाडा (मच्छुआपाडा) भागात घडली. रंगपूर मेट्रोपोलिटन कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी (ओसी) नजमुल कादर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांनी बंद घराचे कुलूप तोडून चारही मृतदेह बाहेर काढले. मृतांमध्‍ये रंगपूर जिल्हा शाळेचे निवृत्त शिक्षक आणि होमिओपॅथिक डॉक्टर गणपती चक्रवर्ती (६५), त्‍यांच्‍या पत्‍नी प्रीतिलता चक्रवर्ती (५०), मुलगी आगामी चक्रवर्ती (२३), मुलगा प्रियम चक्रवर्ती (१२) यांचा समावेश आहे.

वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते मृतदेह

गुन्हे अन्वेषण विभागाचे (CID) तपास अधिकारी सुबीर चौधरी यांनी सांगितले की, पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घरात प्रवेश केला तेव्हा मृतदेह घराच्या वेगवेगळ्या भागात पडलेले दिसले. जिन्यावर आई (प्रीतिलता) आणि मुलगी (आगामी) यांचे मृतदेह होते, छतावर निवृत्त शिक्षक गणपती चक्रवर्ती यांचा मृतदेह आढळला, तर १२ वर्षांचा मुलगा प्रियम याचा मृतदेह खाटेखाली लपवून ठेवण्यात आला होता.

गुरुवारपासून मोबाईल फोन होता बंद

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार दुपारनंतर कुटुंबाशी कोणताही संपर्क होऊ शकत नव्हता. प्रीतिलता यांची लहान बहीण पूजा चक्रवर्ती यांनी सांगितले की, गुरुवारी दुपारी तिचे बहिणीशी बोलणे झाले होते, त्यानंतर कुटुंबातील चारही सदस्यांचे फोन सतत बंद येत होते.शनिवारी रात्री नातेवाईक दासपाडा येथील त्यांच्या नवीन घरी पोहोचले असता मुख्य दाराला कुलूप होते आणि घरातील सर्व दिवे बंद होते. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. गणपती चक्रवर्ती अत्यंत शांत आणि साध्या स्वभावाचे व्यक्ती होते, त्यांचे कोणाशीही वैर नव्हते, असे नातेवाईकांनी स्पष्ट केले.

सीआयडी आणि डीबीकडून तपास सुरू

रंगपूर पोलीस, गुन्हे अन्वेषण विभाग (CID) आणि डिटेक्टिव्ह ब्रांच (DB) यांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सध्या हत्येचे कारण, वेळ आणि यामागच्या गुन्हेगारांचा शोध लागलेला नाही. फॉरेन्सिक टीम पुरावे गोळा करत असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news