

क्वेट्टा ः वृत्तसंस्था
पाकिस्तानातील एक प्रांत बलुचिस्तान येथील बलुच आर्मीने पाकच्या एक तृतीयांश प्रांतावर ताबा मिळवत स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा केली. बलुच लिबरेशन आर्मीच्या या घोषणेने पाकिस्तानपुढे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, बलुच लिबरेशन आर्मीच्या तडाख्याने अनेक पाकिस्तानी सैनिकांनी पलायन केले आहे.
अफगाणिस्तान आणि इराण सीमेलगत असलेल्या भागावर नियंत्रण मिळवले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. याशिवाय पाकिस्तानी लष्कराने आपल्या काही चौकी सोडून माघार घेतली असून, सध्या पाकिस्तानच्या अनेक भागांत आणीबाणीसद़ृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्याचाही दावा ‘बीएलए’ने केला आहे.
‘बीएलए’ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मस्टंग आणि लाखी भागात त्यांनी पाक लष्कर व त्यांच्या सहयोगींवर सहा वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले. या कारवायांत रिमोट कंट्रोल आणि इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईसेस (आयईडी) चा वापर करून पाकिस्तानी लष्कराच्या गुप्तचर आणि संवाद यंत्रणा असलेल्या टॉवर्सना लक्ष्य करण्यात आले.
गुरुवारी पहाटे साडेचार वाजता जमरानच्या ढांग भागात ‘बीएलए’ने पाक लष्कराच्या बॉम्ब निकामी पथकावर (बीडीएस) हल्ला केला. यामध्ये एका लष्करी अधिकार्याचा जागीच मृत्यू झाल्याचा दावा ‘बीएलए’ने केला आहे. त्यांनी सांगितले की, पाक लष्कराच्या अनेक तळांवर ग्रेनेड हल्ले करण्यात आले असून, यात अनेक जवान ठार झाले आहेत. दरम्यान, ‘बीएलए’ने अनेक ठिकाणचे पाकिस्तानी झेंडे काढून टाकून त्या ठिकाणी आपले झेंडे फडकावले आहेत.
बलुच मजदूर मशिन मॅन संघटनेने स्थानिक नागरिकांना इशारा दिला आहे की, बलपूर्वक ताबा मिळवणार्या शक्तींना कोणतीही मदत देऊ नये किंवा सहकार्य करू नये. परिस्थिती तणावपूर्ण असून, पाकिस्तानी लष्करावरचा दबाव वाढत चालला आहे.