पुढारी ऑनलाईन डेस्क : रोजच्या जगण्यात अनेक प्रसंग येतात. काही आनंदाचे तर काही आपली फजिती उडविणारेही असतात. मात्र सार्वजनिक ठिकाणी उडालेली फजिती सर्वांसाठी नामुष्कीजनक असते. अशात व्यक्ती जर सेलेब्रिटी किंवा मोठा राजकीय नेता असेल तर तो चर्चेचा विषय ठरतो. मात्र प्रसंग फजिती उडविणारा जरी असला तरी त्याला कोण कसे सामोरे जातो? यावरच या प्रसंगाचीही चर्चा होते. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांबबातही हेच झाले. त्यांनाही अशाच एका नामुष्कीजनक प्रसंगाला सामोरे जावे लागले. मात्र अवघ्या काही क्षणात स्वत:ला सावरत त्यांनी केलेल्या कृतीने उपस्थितांची मने जिंकली.
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या निवडुकीची रणधुमाळी सुरु आहे. येथे ३ मे रोजी मतदान होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. न्यू साउथ वेल्समध्ये गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या प्रचारानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाषणानंतर फोटो काढताना ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्टेजवरून पडले. कार्यक्रमस्थळी एकच घबराट पसरली.
सार्वजनिक कार्यक्रमा स्टेजवरुन पडणे तसे नामुष्कीजनकच. मात्र ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी अशा प्रसंगानंतरही स्वत:ला तत्काळ सावरले. अल्बानीज हसले आणि स्वतःला सावरले. दोन्ही हात उंचावत आपण ठीक असल्याचे समर्थकांना सांगितले. अवघ्या काही सेंकदात त्याने केलेली कृती पाहून उपस्थित थक्क झाले. या घटनेचाव्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झालेल्या व्हिडिओंमध्ये अल्बानीज दुसऱ्या बाजूला चालत असताना स्टेजवरून खाली पडताना दिसतात.
या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला दिलेल्या रेडिओ मुलाखती अँथनी अल्बानीज यांनी सांगितले की,स्टेजवर एक पाऊल मागे हटलो. मी स्टेजवरून पडलो नाही.फक्त एक फूट खाली पडलो, तरीही मी आनंदी होतो."
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या निवडुकीची रणधुमाळी सुरु आहे. येथे ३ मे रोजी मतदान होणार आहे. अँथनी अल्बानीज यांच्या लेबर पार्टीकडे ७८ जागा आहेत. केवळ दोन जागांच्या बहुमताने ते सरकार चालवत होते. मतदान पूर्व चाचण्यांमध्ये यावेळी ऑस्ट्रेलियात त्रिशंकू संसदेचे संकेत मिळत आहेत. तर पुन्हा एकदा बहुमताने सरकार स्थापन करु, असा विश्वास अल्बानीज व्यक्त करत आहेत. विरोधी पक्षनेते पीटर डटन यांच्या नेतृत्वाखालील रूढीवादी लिबरल-नॅशनल विरोधी पक्षही आघाडीवर आहे. देशात युतीचे सरकार येईल, अशी आशा पीटर डटन यांनी व्यक्त केली आहे. देशातील राजकीय विश्लेषकांच्या माहिती नुसार, यंदा ऑस्ट्रेलियातील निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. दोन्ही प्रमुख पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने देत आहेत.