

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये ‘वंदे मातरम्’ गायन सक्तीचे केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.
गोरखपूर येथील एकता रॅलीत बोलताना ते म्हणाले की, या निर्णयामुळे नागरिकांमध्ये भारतमाता आणि मातृभूमीबद्दल आदर आणि अभिमानाची भावना निर्माण होईल. ते म्हणाले, ‘राष्ट्रगीत वंदे मातरम्बद्दल आदराची भावना असली पाहिजे. आम्ही उत्तर प्रदेशातील प्रत्येक शाळा आणि शैक्षणिक संस्थेत त्याचे गायन सक्तीचे करणार आहोत. राष्ट्रगीताप्रती कृतज्ञता व्यक्त करत, हे गीत प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात सार्वजनिकपणे म्हटले आणि गायले गेले पाहिजे. हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. राष्ट्रीय एकता आणि अखंडता कमकुवत करणाऱ्या घटकांना आपण ओळखले पाहिजे,’ असे ते गोरखपूरमध्ये म्हणाले.