ढाका : बांगला देशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाच्या खासदाराच्या हॉटेलची जाळपोळ करण्यात आली. या दुर्घटनेत 25 जणांना जिवंत पेटवले असून, बांगला देशी अभिनेते शांतो खान आणि त्यांचे वडील यांची आंदोलकांनी हत्या केली. सोबतच हिंदू महिलांवर विविध ठिकाणी अत्याचार केले जात असून, बारावीतील एका युवतीने यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तेथील भीषण परिस्थितीवर झगझगीत प्रकाश टाकला आहे.
हसीना पायउतार झाल्यानंतर अवामी लीग पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे. या पक्षाच्या खासदाराच्या हॉटेलवर हल्ला करून हॉटेल पेटवून दिले. यामध्ये 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. आंदोलकांकडून हिंसा सुरूच असून, हिंदूंना टार्गेट केले जात आहे. हिंदू मंदिरांवरील हल्ले सुरूच असून, हिंदूंच्या घरांवरही चाल केली जात आहे. दरम्यान, बांगला देशातील हिंसाचारामध्ये आतापर्यंत 500 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप हिंसाचाराची धग कायम आहे, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान आहे. पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.