

कॅलिफोर्निया; वृत्तसंस्था : एका अंतराळवीराच्या गंभीर वैद्यकीय कारणास्तव, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले क्रू-11 चे 4 सदस्य बुधवारी रात्री पृथ्वीवर सुखरूप परतले. ‘स्पेसएक्स’च्या ‘एंडेव्हर’ या क्रू ड्रॅगन कॅप्सूलने कॅलिफोर्नियाजवळील पॅसिफिक महासागरात यशस्वीरीत्या स्प्लॅशडाऊन केले. अंतराळस्थानकातून वैद्यकीय आणीबाणीमुळे अंतराळवीर परत आणण्याची ही पहिलीच वेळ आहे.
वैद्यकीय कारणामुळे नियोजित वेळेच्या काही आठवडे आधीच या चारही अंतराळवीरांना परत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. पॅराशूटच्या साहाय्याने हे यान सॅन दिएगोच्या समुद्रात रात्री 12.45 वाजता उतरले. ‘नासा’चे प्रशासक जेरेड इसाकमन यांनी 8 जानेवारी रोजी या आणीबाणीची घोषणा केली होती. अंतराळवीरांपैकी एकाला गंभीर वैद्यकीय समस्या असल्याचे सांगण्यात आले, ज्यासाठी जमिनीवर तातडीच्या उपचारांची गरज होती. गोपनीयता राखण्यासाठी ‘नासा’ने संबंधित अंतराळवीराचे नाव किंवा आजाराचे स्वरूप स्पष्ट केलेले नाही. मात्र, हा आजार कामाच्या दरम्यान झालेल्या कोणत्याही दुखापतीमुळे झालेला नाही, असे ‘नासा’ने स्पष्ट केले आहे.
या मोहिमेत ‘नासा’च्या झेना कार्डमन, माईक फिन्के, जपानचे किमिया युई आणि रशियाचे ओलेग प्लॅटोनोव्ह यांचा समावेश होता. ऑगस्टमध्ये फ्लोरिडाहून प्रक्षेपित झालेल्या या टीमने अंतराळात 167 दिवस घालवले. यान सुखरूप उतरल्यानंतर कमांडर झेना कार्डमन यांनी रेडिओवरून संदेश दिला की, ‘घरी परतल्याचा आनंद होत आहे.’