पाकिस्तानचा शांतिदूत अवतार की, अमेरिकेतील लॉबिंगचा खेळ?

ट्रम्प यांच्याशी जवळीक वाढवण्यासाठी असीम मुनीर यांचे पडद्यामागे लॉबिंग
पाकिस्तानचा शांतिदूत अवतार की, अमेरिकेतील लॉबिंगचा खेळ?
Published on
Updated on

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळण्यासाठी सध्या पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. जागतिक शांततेसाठी पाकिस्तान प्रयत्नशील असल्याचे चित्र निर्माण केले जात असले, तरी यामागे कोणतीही मुत्सद्देगिरी नसून अमेरिकेतील एका बलाढ्य लॉबिंग फर्मचा मोठा हात असल्याचे उघड झाले आहे. टेक्सास स्थित लिंडन स्ट्रॅटेजीज या फर्मने गेल्या काही वर्षांपासून केलेल्या प्रयत्नांमुळेच पाकिस्तानला थेट व्हाईट हाऊसपर्यंत प्रवेश मिळाल्याची चर्चा रंगली आहे.

मुनीर आणि ट्रम्प यांची ती भेट

2025 मध्ये पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ओवल ऑफिसमध्ये झालेली भेट अत्यंत चर्चेत राहिली होती. विशेष म्हणजे, या भेटीत पाकिस्तानचे निवडून आलेले पंतप्रधान उपस्थित नव्हते. या भेटीचे सूत्रधार स्टीफन पेन आणि त्यांची लिंडन स्ट्रॅटेजीज ही फर्म होती. या फर्मनेच पाकिस्तानची प्रतिमा सुधारण्यासाठी आणि ट्रम्प प्रशासनाशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी पडद्यामागून हालचाली केल्या.

नोबेल नामांकन व गिफ्टचा वर्षाव

ट्रम्प यांना खूश करण्यासाठी पाकिस्तानने अनेक पावले उचलली. स्टीफन पेन यांच्या सल्ल्यानुसारच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले. एवढेच नाही, तर असीम मुनीर यांनी व्हाईट हाऊसच्या भेटीत ट्रम्प यांना मौल्यवान रत्ने आणि दुर्मीळ खनिजांनी भरलेला ब्रीफकेस भेट दिला होता. या बदल्यात ट्रम्प यांनी मुनीर यांचा गौरव फेव्हरेट फिल्ड मार्शल असा केला, जे कधी काळी पाकिस्तानवर निर्बंध लादण्याच्या तयारीत होते.

ट्रम्प कुटुंबासोबत क्रिप्टो डील?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने अमेरिकेतील या लॉबिंग फर्मच्या माध्यमातून ट्रम्प कुटुंबाला फायदा होईल असा क्रिप्टो फ्रेंडली प्रस्ताव दिला आहे. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर सहकार्य व या छुप्या आर्थिक व्यवहारांमुळेच ट्रम्प यांची पाकिस्तानबद्दलची भूमिका 180 अंशांत बदलल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पाकिस्तान मेसेंजर की मध्यस्थ?

अनेक आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, पाकिस्तान हा शांतिदूत नसून केवळ दोन्ही देशांमधील संदेशांची देवाणघेवाण करणारा एक संदेशवाहक (मेसेंजर) आहे. चीनचा इराणवरील प्रभाव आणि पाकिस्तानची अमेरिकेतील लॉबिंग या जोरावरच इस्लामाबाद सध्या जागतिक राजकारणात आपले वजन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news