

ढाका; वृत्तसंस्था : बांगला देशात हिंसक निदर्शनांदरम्यान हिंदूंवर हल्ले करण्याचे सत्र सुरूच असून, 8 जानेवारीला आणखी एका हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. जॉय महापात्रो नावाच्या एका हिंदू तरुणाला आधी अमानुषपणे मारहाण करण्यात आली आणि नंतर त्याला विष पाजण्यात आले. यामुळे भारतात संतापाचा आगडोंब उसळला आहे. दरम्यान, पाकिस्तानातही हिंदू तरुणाला ठार मारण्यात आले आहे.
गेल्या 39 दिवसांत बांगला देशात झालेली ही 12 वी हिंदू हत्या आहे. सुनामगंज जिल्ह्यातील दिराई उपजिल्ह्यातील भंगदोहोर गावात महापात्रोची हत्या जमावाकडून करण्यात आली. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, जॉयला आधी मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर अमीरूल इस्लाम नावाच्या स्थानिक मुस्लिम व्यक्तीने त्याला विष पाजले. त्यानंतर सिलहट येथील एमएजी उस्मानी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे भारतात संतापाचा आगडोंब उसळला आहे.
कठोर कारवाई करा; भारताने ठणकावले
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, आम्ही बांगला देशात अल्पसंख्याकांसह त्यांच्या घरांवर आणि व्यवसायांवर वारंवार होणार्या हल्ल्यांची चिंताजनक मालिका पाहत आहोत. अशा जातीय घटनांशी तत्काळ आणि कठोरपणे सामना करणे आवश्यक आहे. आम्ही अशा घटनांना वैयक्तिक शत्रुत्व, राजकीय मतभेद किंवा बाह्य कारणांशी जोडण्याची एक चिंताजनक प्रवृत्ती पाहिली आहे. अशाप्रकारच्या दुर्लक्षामुळे गुन्हेगारांचे धैर्य वाढते आणि हिंदू समुदायात भीती व असुरक्षिततेची भावना अधिक गडद होते.