

द हेग (नेदरलँडस्) : पाकिस्तानचे लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा स्वतःच्याच देशातील पश्तून भागात दहशतवादी संघटनांची निर्मिती, त्यांना आर्थिक रसद आणि प्रशिक्षण देत असल्याचा अत्यंत गंभीर आरोप ‘पश्तून तहफुज मुव्हमेंट’चे प्रमुख मंजूर पश्तीन यांनी केला आहे.
'द हेग जस्टिस डायलॉग २०२६' या आंतरराष्ट्रीय मंचावर बोलताना पश्तीन यांनी पाकिस्तानी लष्कराचा खरा चेहरा जगासमोर उघड केला. पश्तीन यांच्या भाषणामुळे प्रचंड खळबळ उडाली असून पाकिस्तानचे प्रतिनिधी आसिफ दुर्रानी आणि त्यांच्या राजदूतांनी भर सभेतून सभात्याग (वॉकआऊट) केला.
विस्थापनाचा लष्करी कट
मंजूर पश्तीन म्हणाले की, माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ, माजी आयएसआय प्रमुख हमीद गुल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दहशतवादी संघटनांची स्थापना केल्याचे पूर्वीच उघड झाले आहे. पाकिस्तानी लष्कर खनिज आणि मौल्यवान धातूंनी समृद्ध असलेल्या पश्तून भागाला आधी प्रॉक्सी दहशतवादी गटांमार्फत अस्थिर करते. त्यानंतर दहशतवादविरोधी मोहिमांच्या नावाखाली स्थानिक आदिवासींना त्यांच्या वडिलोपार्जित जमिनींवरून बेदखल केले जाते, जेणेकरून तिथली साधनसंपत्ती सहज लुटता येईल.
लष्करी कारवायांचे भयंकर वास्तव
पश्तीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००४ पासून राबवलेल्या हजारो लष्करी कारवायांमुळे शांतता प्रस्थापित होण्याऐवजी पश्तून भूमी उद्ध्वस्त झाली. गेल्या २२ वर्षांत तब्बल ७६,००० निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला असून ६,७०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत.