गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका | पुढारी

Published on
Updated on

बँकॉक : वृत्तसंस्था

उत्तर थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या फुटबॉल संघातील सर्व बारा खेळाडू आणि प्रशिक्षकाला बाहेर काढण्याची मोहीम अखेर मंगळवारी फत्ते झाली. सर्व मुले सुखरूप आहेत, त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.  

फुटबॉल संघाचे प्रशिक्षक  एकापोल चाँटावोंग आपल्या 12 विद्यार्थ्यांसह एका प्रॅक्टिस मॅचनंतर कुतुहलापोटी थाम लुआंग गुहेत गेले होते. मुसळधार पावसाने गुहेतील पाण्याचा स्तर वाढला आणि सगळे जण गुहेतच अडकले. थायलंडच्या नौदलाच्या पथकांच्या मदतीने गेले आठवडाभर सर्वांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. या सर्वांना शोधण्यातच चार ते पाच दिवस गेले. रविवारी त्यांचा शोध लागला. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात आली. याच दिवशी 4 खेळाडूंना, तर दुसर्‍या दिवशी आणखी 4 खेळाडूंना गुहेतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. आज उरलेले 4 खेळाडू आणि त्यांचा प्रशिक्षक अशा पाच जणांना बाहेर काढण्यात यश आले. या बचाव मोहिमेत थायलंडच्या नौदलातील एक जवान मृत्युमुखी पडला आहे.  गुहेतून बाहेर काढलेल्या मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनेक दिवस गुहेत राहिल्यामुळे आणि उपासमार झाल्यामुळे त्यांना अशक्‍तपणा जाणवत आहे. त्यांना कोणत्या रोगाची लागण झाली आहे का, याची तपासणी डॉक्टर करीत आहेत. रोगाचा प्रसार होण्याचा धोका असल्यामुळे या मुलांना त्यांच्या घरच्यांपासून दूरच ठेेवण्यात आले आहे. 23 जूनपासून हे सर्व जण गुहेत अडकले होते. गुहेच्या बाहेर आढळलेल्या सायकलींवरून ते आत अडकल्याचे समजले. ते सगळे जिवंत असल्याचे कळल्यानंतर थायलंड सरकारने युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news