

पुढारी : जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जगभरातील अर्थव्यवस्थांचा आढावा घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेचे अध्यक्ष अजयपाल सिंह बंगा ( Ajay Banga, President of the World Bank) यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केले.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) दर सहा टक्क्यांहून अधिक आहे. नजीकच्या काळात भारताचा जीडीपी ७ टक्क्क्यांहून अधिक असेल. भारत सरकारच्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत. भारत सरकारने देशवासीयांचे राहणीमान सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. प्रदूषणाला आळा, स्वच्छ पाणी आणि शाश्वत विकासासाठी जागतिक बँकेकडून भारताला मदत करण्यात येणार असल्याचे बंगा यांनी सांगितले.
केंद्र सरकारने उपाययोजनांमुळे रोजगार वृद्धी होत आहे. विशेष म्हणजे, देशांतर्गत बाजारपेठ मजबूत झाल्यामुळे विकास दर झेपावत आहे. रोजगार निर्मितीमध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतीय अर्थव्यवस्था २०३० पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था होणार असल्याचे एस अँड पी या पतमानांकन संस्थेने म्हटले आहे. भारताची उत्पादन क्षमता वाढत असताना लोकसंख्यावाढीचे आव्हानही भारतासमोर असेल, असेही या संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.