

बर्मिंगहॅम; वृत्तसंस्था : पंजाबमधील अमृतसर येथून इंग्लंडच्या बर्मिंगहॅमसाठी निघालेल्या एअर इंडियाच्या एआय-117 (बोईंग ड्रीमलायनर 787-8) या विमानाचे बर्मिंगहॅम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सुदैवाने, हे लँडिंग पूर्णपणे सुरक्षित पार पडले असून, सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप आहेत.
ही घटना 4 ऑक्टोबर रोजी घडली. विमानाने दुपारी 12.52 वाजता अमृतसरहून उड्डाण केले होते. सुमारे 10.45 तासांच्या प्रवासानंतर विमान बर्मिंगहॅममध्ये पोहोचले. मात्र, लँडिंग करण्याच्या काही वेळापूर्वी पायलटने विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे पाहिले. विमानाची ‘रॅम एअर टर्बाईन’ (आरएटी ) अचानक सक्रिय झाली होती, ज्यामुळे पायलटने तत्काळ इमर्जन्सी लँडिंगची घोषणा केली.
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, तपासणीत विमानाची इलेक्ट्रिकल आणि हायड्रॉलिक प्रणाली व्यवस्थित काम करत असल्याचे आढळून आले. खबरदारी म्हणून, विमान सध्या ग्राऊंडेड करण्यात आले असून, त्याची दिल्लीला परतणारी विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. सर्व प्रवाशांसाठी दुसर्या विमानाची सोय करण्यात आली.