

न्यू यॉर्क : व्हेनेझुएलावर केलेल्या लष्करी कारवाईनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता जगाला उघडपणे धमकावत आहेत. इराणपासून लॅटिन अमेरिकेपर्यंतच्या विविध देशांवर कारवाई करण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. ट्रम्प यांच्या 'हिटलिस्ट'वर असलेल्या अशा ५ देशांचा हा आढावा.
अमेरिकेने विशेष लष्करी कारवाई करून व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक करून अमेरिकेत आणले आहे. या अटकेच्या निषेधार्थ जगभरातून प्रतिक्रिया उमटत असून मादुरो यांच्या सुटकेची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, सोमवारी (दि. ५) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) वेनेझुएलातील अमेरिकन कारवाई आणि मादुरो यांच्या अटकेबाबत तातडीची बैठक बोलावण्यात आली. याच दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको, इराण, कोलंबिया, क्युबा आणि ग्रीनलँड या ५ देशांबाबत अत्यंत कठोर भूमिका मांडली आहे.
व्हेनेझुएलाच्या कारवाईनंतर ट्रम्प यांनी शेजारील देश मेक्सिकोला निर्वाणीचा इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले, ‘मेक्सिकोला आपली परिस्थिती सुधारावी लागेल. मेक्सिकोच्या मार्गाने अमेरिकेत अमली पदार्थांची तस्करी होत आहे आणि त्यावर आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील.’ मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शिनबाम यांचा उल्लेख करताना ट्रम्प म्हणाले की, ‘त्या एक सक्षम नेत्या आहेत, परंतु दुर्दैवाने तिथे गुन्हेगारी टोळ्या (कार्टेल्स) अत्यंत प्रबळ आहेत. सद्यस्थितीत मेक्सिकोचे नियंत्रण सरकारकडे नसून या टोळ्यांकडेच आहे.’ ट्रम्प यांनी यापूर्वीच अमली पदार्थांच्या तस्करीच्या मुद्द्यावरून मेक्सिकोवर २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची धमकी दिली आहे.
क्युबाबाबत भाष्य करताना ट्रम्प यांनी दावा केला की, ‘व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर आता क्युबाचा अंत जवळ आला आहे. उत्पन्नाचे सर्व स्रोत आटल्याने क्युबाचे सरकार लवकरच कोसळेल. त्यांना व्हेनेझुएलाच्या तेलातून मिळणारे उत्पन्न आता बंद झाले आहे.’
उल्लेखनीय आहे की, १९६० पासून अमेरिकेने क्युबावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. व्हेनेझुएलातील कारवाईदरम्यान क्युबाचे अनेक लष्करी अधिकारी मारले गेल्याचे वृत्त आहे, ज्याचा निषेध क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगुएल डियाझ-कॅनेल यांनी केला आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी डेन्मार्कचा स्वायत्त भाग असलेल्या ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. ‘राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ग्रीनलँडचे धोरणात्मक स्थान महत्त्वाचे आहे. सध्या हा भाग रशियन आणि चिनी जहाजांच्या विळख्यात आहे,’ असे ट्रम्प म्हणाले.
५७,००० लोकसंख्या असलेल्या ग्रीनलँडमध्ये लोह, युरेनियम आणि झिंक यांसारख्या दुर्मिळ खनिजांचे मोठे साठे आहेत. ग्रीनलँड हा 'नाटो'चा सदस्य असल्याने डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी ट्रम्प यांना इशारा दिला आहे की, त्यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या धमक्या देणे थांबवावे.
ट्रम्प यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे. ‘कोलंबिया आणि व्हेनेझुएला हे दोन्ही देश सध्या डबघाईला आले आहेत. राजधानी बोगोटामध्ये असे सरकार आहे ज्यांना कोकेन बनवून अमेरिकेत विकण्यात रस आहे,’ असा गंभीर आरोप ट्रम्प यांनी केला. कोलंबियावर लष्करी कारवाई करण्याच्या शक्यतेवर बोलताना ट्रम्प यांनी ‘मला ही कल्पना आवडली आहे,’ असे सूचक विधान केले.
इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने सुरू असतानाच ट्रम्प यांनी तेथील प्रशासनाला इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले, ‘आम्ही इराणमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. जर त्यांनी पुन्हा एकदा निशस्त्र नागरिकांवर गोळीबार केला किंवा त्यांचा छळ केला, तर अमेरिका अत्यंत जोरदार प्रहार करेल.’ यावर प्रत्युत्तर देताना इराणने म्हटले आहे की, अमेरिकेने आमच्या अंतर्गत बाबींत हस्तक्षेप करून संपूर्ण प्रदेशात अस्थिरता निर्माण करू नये.