

पुढारी ऑनलाईन डेस्क : हमास आणि इस्त्रायल यांच्यामध्ये युद्धबंदी करार लागू झाला आहे. यानंतर हमासकडून कराराचा भाग म्हणून शनिवारी (दि.22) सहा ओलिसांची सुटका केली. यावेळी ओमर शेम तोव या ओलिसाने स्टेजवर जावून दोन दहशतवाद्यांचे चुंबन घेतले. या घटनेचा फोटो सध्या सोशल मिडीयवर तुफान व्हायरल होत आहे.
युद्धा दरम्यान डांबून ठेवल्यानंतर दीर्घ काळानंतर सुटका झाल्यानंतर ओमर शेम तोव यांनी त्यांच्या अपहरणकर्त्यांचे चुंबन घेतले. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, यानंतर त्यांनी खुलासा केला की, त्यांने हे चुंबन दबावाखाली घेतले होते. तसे करण्यास दहशतवाद्यांनीi सांगितले होते. जर असे केले नाही तर त्याला गोळी घातली जाईल, अशी धमकीही देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी दहशतवाद्यांना किस केले.
ओमर शेम तोव यांची सुटका हमासच्या दहशतवादी हल्ल्याच्या वर्षभरानंतर झाली. या हल्ल्यात १,२०० हून अधिक लोक ठार झाले आणि २५० हून अधिक लोकांचे अपहरण करण्यात आले हाेते. ओमर आणि इतर दोन पुरुषांना इस्रायलच्या नेगेव वाळवंटातील नोव्हा संगीत महोत्सवात ओलीस ठेवण्यात आले होते. या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझावर केलेल्या प्रतिहल्लानंतर रक्तरंजित संघर्ष सुरु झाला. यामध्ये ४८,००० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाल्याचा दावा करण्यात आला. अखेर मागील महिन्यात हमास आणि इस्त्रायल यांच्यामध्ये युद्धबंदी करार लागू झाला. यानंतर हमासने ओलिस नागरिकांची तर इस्त्रायलने हमासच्या कैद्यांची सुटका करण्यास सुरुवात केली.