

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानमध्ये आज (दि. १९) दुपारी १२. १७ वाजता ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. तर जम्मू आणि काश्मीरच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. श्रीनगरमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला. अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमावर्ती भागात भूकंपाचे केंद्र होते. सीमेच्या दोन्ही बाजूंनी जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. तर काश्मीर आणि दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. (Afghanistan Earthquake)
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (एनसीएस) नुसार, भूकंप दुपारी १२. १७ वाजता भूपृष्ठाखाली ८६ किमी खोलीवर झाला. काश्मीर खोरे आणि दिल्ली-एनसीआरमध्ये सौम्य ते मध्यम भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. जमिनीतून धक्के जाणवू लागल्यानंतर नागरिक इमारतीतून तत्काळ बाहेर पडले.
श्रीनगरमधील एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, मी ऑफिसमध्ये असताना भूकंपाचे धक्के जाणवू लागले. माझी खुर्ची हादरू लागली. धक्के खूप सौम्य किंवा खूप तीव्र नव्हते. तर भूकंपानंतर काश्मीरमधील दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये घरांमध्ये छताचे पंखे हलताना दिसत आहेत.