

पुढारी ऑनलाईन :
अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तानी चौकीवरील टीटीपीने ताबा मिळवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ टीटीपीने जारी केला आहे. मात्र आता पाकिस्तानी सैन्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, सैन्याच्या या चौकीवर हल्ला करण्याच्या काहीवेळ आधीच ही चौकी पाकिस्तानी सैन्याने मोकळी केली होती.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यावेळी एकमेकांवर धडाधड हल्ले चढवत आहेत. डूरंड लाईन क्रॉस करून पाकिस्तानमध्ये घुसलेले तालिबानी दहशतवादी पाकिस्तानी चौक्यांवर बॉम्बफेक करत आहेत. या दरम्यान एक बातमी समोर आली आहे की, तहरिक-ए-तालिबान (टीटीपी) ने पाकिस्तानी सैन्याच्या एका चौकीवर ताबा मिळवला आहे. मात्र आता यावर पाकिस्तानी सैन्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
पाकिस्तानी सैन्याच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आले आहे की, आमच्या सैन्याला तिथुन दुसरीकडे शिफ्ट केले आहे. ही प्रक्रिया फक्त बाजौर पर्यंत सीमित नव्हती तर या प्रकारे उत्तर आणि दक्षिण वजीरीस्तान मध्येही सैन्याला चौक्यांवरून हटवण्यात आले होते.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसून येते की, तालिबानींनी पाकिस्तानी चौकीवर ताबा मिळवलेला आहे. याच्या आनंदात ते बंदुकी उंचावत नाचत आहेत. त्यांनी पाकिस्तानी पोस्टवरील पाकिस्तानी झेंडा उखडून तेथे टीटीपीचा झेंडा फडकावला आहे.
पाक व अफगाण या दोघांमधील वैमनस्याला कारण ठरली तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान ही पाकमधील दहशतवादी संघटना आणि कोण खरे इस्लामी परंपरेचे वाहक त्यावरून निर्माण झालेली तालिबान व पाकिस्तानातील स्पर्धा... तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेला पाकिस्तानात संपूर्णपणे शरियत व्यवस्था लागू करायची आहे. ही संघटना पाकिस्तानातील शाहबाज शरीफ सरकारला आणि पाक लष्करालाही काफीर मानते. अफगाण हद्दीत या संघटनेचे तळ आहेत.
अफगाणिस्तानातील तालिबान आणि पाकिस्तानातील तहरिक-ए-तालिबान (टीटीपी) पाकिस्तानचे एकमेकांशी संधान आहे. अफगाण तालिबानच्या पाठबळावरच पाकिस्तानात ‘टीटीपी’चा दहशतवाद फोफावतो आहे, असा आरोप पाकिस्तानचे सरकार गेला बराच काळ करत आलेले आहे. आता 24 डिसेंबर रोजी पाकिस्तानने अफगाण हद्दीतील पकटिका प्रांतातील ‘टीटीपी’च्या तळांवर एअर स्ट्राईक केला. 46 लोक यात मरण पावले. त्यामुळे फगाणिस्तानातील तालिबान सरकार संतप्त झाले. सूड उगवला जाईल, असा इशारा दिला आणि इशार्याबरहुकूम सीमेवर कुमकही वाढवली.
अफगाणिस्तानने ड्युरंड रेषा ही ब्रिटिशांनी ठरवलेली सीमा अवैध ठरवली आहे. अफगाणिस्तानचे तालिबानी योद्धे मीर अली सीमेवर दाखल झाले आहेत. पाक हद्दीत बॉम्बगोळेही तालिबान्यांनी फेकले. पाकच्या 2 लष्करी चौक्या नष्ट केल्या.
खोस्त आणि पकटिका प्रांतांना लागून असलेल्या सीमेवर रविवारी सकाळपासूनच दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. दोन्ही बाजूंचे मिळून अनेक सैनिक या चकमकीत मरण पावल्याचे सांगण्यात येते.
अफगाण सैनिकांनी घोजगढी, कोट राघा, माथा संगर आणि तारी मेंगल भागातील पाक चौक्यांवर हल्ले केले. उत्तरादाखल पाक लष्कराने मोठा हल्ला चढवला. तालिबानचे 8 योद्धे त्यात मारले गेल्याचे वृत्त आहे.
‘टीटीपी’च्या दहशतवाद्यांना पाकिस्तानमधील चीनचे अस्तित्वच मान्य नाही. चीनशी त्यांचे शत्रुत्व आहे, असे नाही. चीन पाकला बळ पुरवतो, हे त्यामागचे कारण आहे.
‘टीटीपी’ने पाकमधील खैबर पख्तुनख्वाँतील अफगाण सीमेला लागून असलेल्या अनेक जिल्ह्यांच्या मोठ्या भूभागावर कब्जा जमवलेला आहे.
चिनी नागरिकांवरही ‘टीटीपी’कडून हल्ले होत असतात. चीनचे इस्लामाबादेतील राजदूत जियांग जेदाँग यांनी, अगदी अलीकडेच चीनचा संयम आता संपलेला आहे, असा थेट इशारा पाक सरकारला दिला होता.
‘टीटीपी’चे दहशतवादी आणि बलुच बंडखोरांनी मिळून आजअखेर 21 चिनी नागरिकांच्या हत्या केल्या आहेत.
खोस्त, पकटिका हे पाकिस्तानचे भागच नाहीत. हे तर अफगाणिस्तानचे भाग आहेत.
- इनायतुल्ला खोवाराझमी, प्रवक्ता, अफगाण तालिबान