

Sleep Therapy |तैवानमधील प्रसिद्ध मॉडेल काई यूशिन हिचा ‘मिल्क इंजेक्शन’ची अतिमात्रा झाल्याने मृत्यू झाला. झोपेवरील उपचारासाठी तिला तैपेई येथील फेरी क्लिनिक येथे ‘मिल्क इंजेक्शन’ देण्यात आले हाेते, असे वृत्त 'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने दिले आहे. दरम्यान, या प्रकरणी तैवानमधील प्रसिद्ध कॉस्मेटिक डॉक्टर वु शाओहु यांच्याविरुद्ध स्थानिक प्रशासनाने चौकशी सुरू केली असून, त्यांच्यावर निष्काळजीपणा आणि वैद्यकीय सेवा कायद्याच्या उल्लंघनाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार, काई यूशिन या तैवानमधील प्रसिद्ध मॉडेल होती. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स होते. तिची तुलना बहुतांश वेळा प्रसिद्ध अभिनेत्री लिन ची-लिंग हिच्याशी केली जात असे. मागील काही दिवस कोई यूशिन ही निद्रानाशाच्या त्रासने त्रस्त होती. या त्रासातून सुटका मिळावी या हेतूने त्यांनी एका मित्राच्या सल्ल्यानुसार २५ मे रोजी फेरी क्लिनिकमध्ये 'मिल्क इंजेक्शन' घेण्याचा निर्णय घेतला होता.
वू शाओहू यांना तैवानमध्ये "गॉडफादर ऑफ लायपोसक्शन" म्हणून ओळखले जाते.त्यांनी कोई यूशिनवर निद्रानाशावर उपचार केले. . या उपचारांतर्गत तिला ‘मिल्क इंजेक्शन’ देण्यात आले. ज्यामध्ये प्रॉपोफोल या अल्पकालीन अॅनेस्थेसियाचा समावेश होता. हा औषधप्रकार सामान्यतः वेदना निवारण आणि भूल देण्यासाठी वापरला जातो. उपचारानंतर वु शाओहु यांनी उपचारकक्षातून बाहेर पडले. तिची जबाबदारी एक पुरुष सहाय्यकावर सोपविण्यात आली. त्याच्याकडे वैध नर्सिंग परवाना नव्हता. 'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या वृत्तानुसार, युशिन हिला हृदयविकाराचा झटका आला. तिचा श्वासोच्छवास थांबला. घाबरलेल्या सहाय्यकाने वु यांना संपर्क केला, तेव्हा त्यांनी व्हिडीओ कॉलवरून कार्डियोपल्मनरी रिससिटेशन (CPR) कसे करायचे, याचे मार्गदर्शन दिले. परंतु, तोपर्यंत कै युशिन यांचे श्वसन पूर्णपणे थांबले होते. हृदय बंद झाले होते. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे ती १८ दिवस कोमामध्ये होती. परंतु, प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर तिच्या कुटुंबीयांनी जीवनरक्षक उपकरणे काढून टाकण्याचा अत्यंत दु:खद निर्णय घेतला.
या घटनेनंतर तैवानमधील आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाने तपास सुरू केला असून, वु शाओहु यांच्यावर निष्काळजीपणामुळे गंभीर इजा होणे आणि मेडिकल केअर अॅक्टच्या उल्लंघनाचे आरोप ठेवण्यात आला आहे. प्रॉपोफोल हे औषध वर्ग IV अंतर्गत नियंत्रित पदार्थ म्हणून सूचीबद्ध असून, केवळ अधिकृत आणि प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिकांकडूनच योग्य निरीक्षणाखाली हे औषध देणे कायदेशीर आहे. "अशा घटना दरवर्षी घडतात. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. योग्य वायुमार्ग व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नसलेले वैद्यकीय कर्मचारी असे उपचार देत असतील, तर रुग्णांचे प्राण धोक्यात येतात," असे मत अॅनेस्थेसियोलॉजिस्ट लाई शियानयोंग यांनी व्यक्त केले. या दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर कै युशिन यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असून, अनेकांनी तिची तुलना प्रसिद्ध अभिनेत्री लिन ची-लिंगशी केली आहे. संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नेटिझन्सनी केली आहे.