किव्ह ः वृत्तसंस्था : युक्रेनच्या विशेष फोर्सने शनिवारी उशिरा रात्री दूरवर मारा करणार्या ड्रोन्सद्वारे रशियाच्या आठ परिसरांवर हल्ले केले. सीएनएन या अमेरिकेन वृत्तसंस्थेने ही माहिती दिले. या हल्ल्यात रशियाची तीन ऊर्जा स्थानके आणि एक इंधन डेपो उद्ध्वस्त झाला. या हल्ल्यात दोन नागरिकांचाही मृत्यू झाला. मात्र, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत काहीच दुजोरा दिलेला नाही.
युक्रेनचे सुमारे 50 ड्रोन्स पाडले असल्याचा दावा रशियन लष्कराने केला आहे. रशियाकडूनही सातत्याने युक्रेनच्या ऊर्जा ठिकाणांना लक्ष्य केले जाते. युक्रेनमध्ये थंडीमुळे तापमानात मोठी घसरण होत आहे. देशातील किमान तापमान उणे झाले आहे. रशियन लष्कर याचाच फायदा घेत युक्रेनवर हल्ले करत आहे. ज्यामुळे युक्रेनच्या सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शनिवारी रात्री युक्रेनने रशियावर अनेक ड्रोन हल्ले केले. यामध्ये लष्कराशी संबंधित असलेल्या ऊर्जा स्थानकांचा समावेश आहे. युक्रेनची सुरक्षा यंत्रणा, संरक्षण गुप्तचर यंत्रणा आणि विशेष फोर्सने संयुक्तपणे मोहीम राबवत रशियावर ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यानंतर रशियातील ऊर्जा आणि पाणीपुरवठा ठप्प झाला.गेल्या काही महिन्यांपासून युक्रेनकडून रशियाच्या तेल रिफायनरीसह ऊर्जा स्थानकांवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. रशियाला आर्थिकद़ृष्ट्या कमजोर करण्याचा युक्रेनचा प्रयत्न आहे.
अमेरिकन काँग्रसने युक्रेनला आर्थिक मदत करणारे विधेयक मंजूर केले आहे. याअंतर्गत युक्रेनला अमेरिकेकडून सुमारे 5 लाख कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. यातील सुमारे 1 लाख 91 हजार कोटी रुपयांच्या माध्यमातून अमेरिकन शस्त्रे आणि सुविधांचा पुरवठा केला जाणार आहे. त्याशिवाय 91 हजार कोटी रुपये अमेरिकन सैन्य मोहिमेसाठी फंड म्हणून दिले जाणार आहेत. तसेच 1 लाख 16 कोटी रुपये अत्याधुनिक शस्त्रे खरेदी करण्यासाठी युक्रेनला दिले जाणार आहेत.