Tibet Earthquake | तिबेटमध्ये ७ रिश्टरचा भूकंप; १६ जणांचा मृत्यू, ६५ जखमी

१२ हजारांवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले
Tibet Earthquake |
Tibet Earthquake | तिबेटमध्ये ७ रिश्टरचा भूकंप; १६ जणांचा मृत्यू, ६५ जखमीFile photo
Published on: 
Updated on: 

ल्हासा; वृत्तसंस्था : तिबेटमध्ये गुरुवारी रात्री ७.० तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या नैसर्गिक आपत्तीत १६ जणांचा मृत्यू झाला असून, ६५ जण जखमी झाले आहेत. भूकंपानंतर संभाव्य धोका लक्षात घेऊन १२ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. प्रभावित भागात बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळपर्यंत भूकंपानंतर ४०० हून अधिक दुय्यम धक्के अर्थात आफ्टरशॉक नोंदवण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नागक्यू शहराजवळ केंद्रबिंदू

भूकंपाचा केंद्रबिंदू तिबेटमधील नागक्यू शहराच्या बाछेन काउंटीमध्ये होता. जमिनीपासून १० किलोमीटरपेक्षा कमी खोलीवर भूकंप झाल्याने त्याची तीव्रता अधिक जाणवली. हे ठिकाण तिबेटची राजधानी ल्हासापासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर आहे. प्राथमिक वृत्तांनुसार, भूकंपामुळे ३३० हून अधिक घरे कोसळली किंवा त्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी इमारतींचे नुकसान झाले असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथके कार्यरत आहेत. नुकसानग्रस्त नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बाछेन काउंटीमधील एका प्राथमिक शाळेच्या परिसरातही तंबू उभारले आहेत.

अफगाणिस्तान, पाकिस्तानातही धक्के

तिबेटमधील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानमध्ये ४.९, तर अफगाणिस्तानमध्ये ४.१ तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आल्याची माहिती दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news