ख्राईस्टचर्च : पुढारी ऑनलाईन
न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींमध्ये झालेल्या भीषण नरसंहारामध्ये सात भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये हैदराबादमधील दोन, केरळाची एक महिला आणि गुजरातमधील चार व्यक्तींचा समावेश आहे. अन्य तीन जण भारतीय वंशाचे असून त्यापैकी दोन गुजरात आणि एक तेलगंनातील आहेत.
न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चच्या अवनूर आणि लिनवूड मशिदीत शुक्रवारी दुपारी हल्लेखोराने केलेल्या बेछूट गोळीबारात ४९ जण ठार, तर ५० जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर न्यूझीलंडमधील ९ भारतीय अथवा मूळ भारतीय वंशाचे नागरिक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यातील ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येत आहे.
मृतांमध्ये हैदराबादमधील अहमद इकबाल जहांगीर यांचा समावेश आहे. ते ख्राईस्टचर्च येथील एक रेस्टॉरंट चालवतात. तर दुसरे महबूब खोखर हे अहमदाबादमधील आहेत. ते दोन महिन्यापूर्वी आपल्या पत्नी समवेत आपल्या मुलाला भेटण्यासाठी न्यूझीलंडला गेले होते. तसेच हैदराबादचे ३० वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता फहरराज अहसान यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबांनी दिली. केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील राहणाऱ्या २५ वर्षीय अंशी अलीबावा या महिलेचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. त्या आपल्या पतीबरोबर मशिदीत गेल्या होत्या. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली.
या हल्ल्यात गुजरातमधील चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात भारुचमधील एनआरआय, नवसारीमधील एका व्यक्तीसह वडोदराच्या पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. वडोदरामधील आरिफ वोहरा आणि त्यांचा पुत्र रमीज वोहरा मशिदींवरील दहशतवादी हल्ल्यानंतर बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, शनिवारी, त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय नवसारीमधील जुनेद युसुफ कारा आणि भरुचमधील हाफेज मूसा वली यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
न्यूझीलंडमधील दोन मशिदीत शुक्रवारी दुपारच्या नमाजानंतर हल्ला झाला. यानंतर हल्लेखोर ब्रेन्टॉन हॅरीसन टॅरॅन्टला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, न्यूझीलंडच्या इतिहासातील हा सर्वांत काळा दिवस आहे, अशा शब्दांत व्यथित झालेल्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.