पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि गाझामधील हमास यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. जबलिया या निर्वासित छावणीवर इस्रायलने हवाई हल्ला केला. या हल्ल्यात ही छावणी पुर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या हवाई हल्ल्यात किमान १०० लोक ठार झाल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (३१ ऑक्टोबर) गाझाच्या जबलिया निर्वासित छावणीवर इस्रायलने हल्ला केला. या हवाई हल्ल्यात किमान १०० लोक ठार झाले आहेत. मिंटने दिलेल्या वृत्तानुसार या हल्ल्यानंतर ढिगाऱ्यातून आतापर्यंत ५० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
गाझा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली युद्ध विमानांनी सहा हवाई बॉम्बचा वापर करून निर्वासित छावणीतील एक संपूर्ण निवासी ब्लॉक उद्ध्वस्त केला. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये जवळपास ५० हून अधिक मृतदेह असल्याची शंका वर्तविली जात आहेत.
गाझाच्या मंत्रालयाने याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, "उत्तर (गाझा) पट्टीतील जबलिया कॅम्पमधील घरांच्या मोठ्या भागाला लक्ष्य करणाऱ्या इस्त्रायली हत्याकांडात १०० हून अधिक लोक मरण पावले आहेत. तर सुमारे १५० जखमी झाले आणि डझनभर लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत."