बैरूत : इस्रायलने सोमवारी लेबनॉनवर 1600 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात आतापर्यंत 558 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 58 महिला आणि 50 लहान मुले आहेत. या हल्ल्यांत 1 हजार 645 लोक जखमी आहेत, अशी माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली.
इस्रायल-लेबनॉनदरम्यान 2006 मध्ये झालेल्या युद्धानंतर लेबनॉनवरील इस्त्रायलचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगितले जाते. लेबनॉनमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. लोक सुरक्षित स्थळांचा शोध घेत असल्याने वाहतूक कोंडीही झाल्याचे चित्र विविध शहरांत होते. हिजबुल्लाहने गेल्या 20 वर्षांत उभारलेल्या सर्व पायाभूत सुविधांसह हिजबुल्लाहचे 10 हजार रॉकेट आम्ही नष्ट केले आहेत. हिजबुल्लाहमध्ये आता हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्ला हेच एकटे उरलेले आहेत, असे इस्त्रायल लष्कराकडून सांगण्यात आले. सलग चौथ्या दिवशी इस्रायलने लेबनॉनवर क्षेपणास्त्रे डागली. आजवर एकूण 900 हून अधिक क्षेपणास्त्रे लेबनॉनच्या विविध शहरांवर डागण्यात आलेली आहेत.
लेबनॉनची राजधानी बैरूत येथे मंगळवारी झालेल्या एका इस्त्रायली हल्ल्यात हिजबुल्लाहचा क्षेपणास्त्र कमांडर इब्राहिम कुबैसीसह अन्य 5 जणांचा मृत्यू झाला. इस्रायल गेल्या 5 दिवसांपासून लेबनॉनवर सतत हल्ले करत आहे. हिजबुल्लाहने सोमवारी रात्री इस्रायलमधील 8 ठिकाणांवर 55 रॉकेटनी हल्ला केला होता.