

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या २०२४ वर्षात मोठ्या टेक कंपन्यांत मोठ्या प्रमाणात नोकरकपात झाली. टेक कंपन्यांनी यंदा आतापर्यंत जवळपास दीड लाख कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची आकडेवारी समोर आली आहे. टेस्ला ते इंटेल आणि सिस्को ते मायक्रोसॉफ्ट सारख्या दिग्गज टेक कंपन्यांनी यंदा नोकरकपात केली. याचा फटका लाखो कर्मचाऱ्यांना बसला. या कंपन्यांनी खर्च कमी करणे, त्यांच्या व्यवसायांची पुनर्रचना आणि बाजारातील बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली असल्याची कारणे दिली आहे.
Layoffs.fyi वरील आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये ५१९ टेक कंपन्यांनी १,४९,००६ कर्मचारी कमी केले आहेत. २०२४ मध्ये इंटेल कंपनीला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. या कंपनीने २०२५ पर्यंत १० अब्ज डॉलर खर्च कपात करण्याची घोषणा केली. यात १५ हजार नोकरकपातीचा समावेश आहे. ही नोकरकपात सध्याच्या सुमारे १ लाख २५ हजार मनुष्यबळाच्या १५ टक्केपेक्षा अधिक आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये टेक कंपन्यांनी २,६४, २२० कर्मचारी कपात केली होती.
ही कंपनी २०२६ पर्यंत दरवर्षी संशोधन आणि विकास (R&D) तसेच मार्केटिंगवरील खर्च अब्जावधींनी कमी करणार आहे. ही कंपनी या वर्षी भांडवली खर्चात सुमारे २० टक्के कपात करेल, असे सांगण्यात आले होते.
एलन मस्क यांच्या मालकीच्या टेस्लाने या वर्षी नोकऱ्या कपातीच्या दोन फेऱ्या केल्या. त्यांनी पहिल्या फेरीत किमान १४ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्या सुपरचार्जिंग टीमसह आणखी शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, सुमारे २० हजार कर्मचारी असलेल्या टेस्लाची एकूण नोकरकपात कपात २० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते.
नेटवर्किंग इक्विपमेंट बनवणारी सर्वात मोठी कंपनी सिस्को सिस्टम्सने (Cisco Systems) यंदा दोन फेऱ्यात नोकरकपात केली. पहिल्या फेरीत या कंपनीने जागतिक स्तरावरील ५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. फेब्रुवारीमध्ये या कंपनीने ४ हजार नोकरकपात केली होती. त्यानंतर त्यांनी आणखी ७ टक्के कर्मचारी कपातीची घोषणा केली. या फेरीत सुमारे ६ हजार कर्मचाऱ्यांना धक्का बसला. या कंपनीने नोकरकपातीवेळी कमकुवत आर्थिक स्थितीचे कारण दिले होते.
जर्मन सॉफ्टवेअर कंपनी SAP ने जाहीर केलेल्या पुनर्रचना योजनेचा सुमारे ८ हजार कर्मचाऱ्यांना फटका बसला. दरम्यान, या कंपनीने सांगितले होते की या वर्षाच्या अखेरीस त्यांची कर्मचारीसंख्या समान राहील.
डेल कंपनीने दोन वर्षात दोनवेळा नोकरकपात केली. या कंपनीने बाजारातील आव्हानात्मक परिस्थितीचे कारण देत सुमारे ६ हजार कर्मचारी कमी केले. या कंपनीच्या महसूलात गेल्या वर्षी ११ टक्के घट झाली होती.