इम्रान खान यांच्या अटकेशिवाय परतले पोलिस | पुढारी

इम्रान खान यांच्या अटकेशिवाय परतले पोलिस

लाहोर/इस्लामाबाद : वृत्तसंस्था पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्याचा प्रत्येक प्रयत्न निष्फळ ठरत असताना पोलिसांनीही हा नाद सोडून दिलेला आहे. गुरुवारी पोलिस आणि रेंजर्सचा चमू इम्रान यांच्या जमान पार्क या निवासस्थानी 22 तासांच्या मुक्कामानंतर रिकाम्या हातांनी परतला. लाहोरमध्ये 19 मार्चपर्यंत क्रिकेट सामने आहेत, त्यामुळे शहरात उगीच अशांतता नको, असा बहाणा परतणार्‍या पोलिसांनी मारलेला आहे. पोलिस जमान पार्कवरून परतले तसा इम्रान यांच्या तहरिक-ए-इन्साफ पाकिस्तान (पीटीआय) पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला.

लाहोरमध्ये 15 ते 19 मार्चदरम्यान पाकिस्तान सुपर लीग- सीजन आठअंतर्गत (पीएसएल-8) क्रिकेट स्पर्धांचे आयोजन आहे. पाकिस्तानी आणि परदेशी खेळाडू त्यात सहभागी होत आहेत. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेला धोका असेल, तर या खेळाडूंना अडचणी येऊ शकतात. म्हणून आम्ही जमान पार्कवरून बंदोबस्त मागे घेतलेला आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी माघार घेण्यापूर्वी इम्रान यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केलीच, त्यासह पेट्रोल बॉम्बही फेकले. पोलिसांनी अश्रूधुराचा आणि पाण्याचा मारा करून लोकांना नियंत्रणात आणले. गृह विभागाने इम्रान यांच्या निवासस्थानी हेलिकॉप्टर आणि ड्रोनही तैनात करून ठेवलेले होते.

पोलिसांनी गोळीबारही केला, पण कार्यकर्त्यांनी त्याला जुमानले नाही. माझी अटक हे केवळ एक निमित्त आहे. सत्ताधार्‍यांना माझी हत्या करायची आहे. लंडनमध्येच हा कट शिजलेला आहे.
इम्रान खान, माजी पंतप्रधान, पाकिस्तान

Back to top button