काश्मीर मुद्दा युनोसमोर आणण्यात अनंत अडचणी

इस्लामाबाद : वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्रांच्या (युनो) अजेंड्यावर काश्मीरचा विषय आणायचा तर वाटेत अनंत अडचणींचे डोंगर आहेत, अशी जाहीर कबुली पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी अखेर दिली. याआधी झरदारी यांनी भारत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात गरळ ओकली होती. बिलावल यांनी जे शब्द वापरले होते, त्याबद्दल त्यांना प्रचंड टीकेचा सामना करावा लागला होता. यावेळी मात्र भारताचा उल्लेख करतानाही त्यांची जीभ बरेचदा अडखळली.
आधी मित्र म्हणून भारताचा उल्लेख त्यांनी केला. नंतर स्वत:ला सावरत हमसाया मुल्क (शेजारी देश) असा शब्द त्यांनी भारतासाठी योजिला. बिलावल यांनीच यापूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील चर्चेत जम्मू-काश्मीरचा मुद्दा लावून धरला होता. भुट्टोंना उत्तर देण्याचीही आम्हाला गरज वाटत नाही, असे उत्तर भारताने त्यावेळी दिले होते. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी भुट्टोंना चांगलेच धारेवर धरले होते.
काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम 370 रद्द करणे हा भारताचा अंतर्गत विषय आहे. पाकिस्तानने त्यात नाक खुपसण्याचे काय कारण आहे, असे रुचिरा कंबोज यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठासून सांगितले होते. पाकने दुष्प्रचार बंद करण्याचा, दहशतवाद संपविण्याचा, शांतताप्रिय शेजारी बनण्याचा, हिंसामुक्त होण्याचा सल्ला त्यांनी दिला होता.