सैफ अल आदेल ’अल कायदा‘चा नवा म्होरक्या | पुढारी

सैफ अल आदेल ’अल कायदा‘चा नवा म्होरक्या

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था अयमान अल जवाहिरीनंतर आता अल कायदा या दहशतवादी संघटनेचे नेतृत्व सैफ अल आदेल या दहशतवाद्याकडे सोपवण्यात आले आहे. तो इराणमधून संघटनेची सूत्रे हलवत असल्याचा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने केला आहे. 2022 मध्ये अयमान अल जवाहिरी या अमेरिकेने संपवल्यानंतर अल कायदा संघटना विस्कळीत झाल्याचे बोलले जात होते. तालिबानच्या पाठीशी अल कायदा असली तरी अफगाणिस्तानातही आयसिसचा जोर वाढत असल्याने ही चर्चा जोरात होती, पण आता अल कायदाने आपल्या संघटनेचे पुनर्गठन करण्याचे प्रयत्न चालवले असून इराणमधील दहशतवादी सैफ अल आदेल याच्याकडे संघटनेची सूत्रे गेली आहेत.

तो आता इराणमधून संघटना चालवत आहे. आयसिसचा उपद्रव वाढत असताना अफगाणिस्तानात तालिबानसोबत समन्वय राखण्याची जबाबदारी सैफवर आहे. सैफबाबत संयुक्त राष्ट्रांत सादर केलेल्या अहवालाचा हवाला देत अमेरिकी परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सैफ आदेल सध्या इराणमध्येच असून त्याचा नेमका ठावठिकाणा हाती आला नाही.

कोण आहे सैफ अल आदेल

सैफ आदेल हा 62 वर्षांचा असून तो इजिप्शीयन लष्कराच्या विशेष दलात लेफ्टनंट कर्नल होता.
अल कायदा संघटनेत आल्यानंतर त्याच्यावर वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले.
या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना काय करावे लागेल याचे बारकाईने प्लॅनिंग त्याने करून दिले होते.
सैफ हा जगभरातील दहशतवादी वर्तुळात सर्वात अनुभवी माजी लष्करी अधिकारी मानला जातो.

Back to top button