

रियाध/हैदराबाद; वृत्तसंस्था : सौदी अरेबियामध्ये उमराह यात्रेकरूंना घेऊन जाणार्या एका बसला टँकरने धडक दिल्यानंतर भीषण आग लागून झालेल्या अपघातात 45 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 20 महिला आणि 11 बालकांचा समावेश आहे. अपघातग्रस्त बसमधील बहुतांश यात्रेकरू हैदराबाद (राज्य तेलंगणा) येथील होते, अशी माहिती हैदराबादमधील इमिग्रेशन अधिकार्यांनी दिली. बसमध्ये एकूण 46 प्रवासी होते, त्यापैकी केवळ एकजण बचावला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबीयांपैकी दोन सदस्यांना मृतदेह आणण्यासाठी तेलंगणा सरकार पाठवणार आहे. मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
हा हृदयद्रावक अपघात बद्र आणि मदिनादरम्यान मुफ्राहाथ येथे रविवारी मध्यरात्री अंदाजे 1.30 वाजता घडला. हा रस्ता सामान्यतः वेगवान वाहतुकीसाठी ओळखला जातो. अपघाताच्या वेळी बहुतेक प्रवासी झोपेत असल्याने, या दुर्घटनेची तीव्रता आणखी वाढली. रियाधमधील भारतीय दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास सौदी अरेबियाच्या अधिकार्यांशी समन्वय साधून सर्वतोपरी मदत करत असल्याचे त्यांनी नमूद केले. परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि अल्पसंख्याक व्यवहारमंत्री किरेन रिजिजू यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही मृतांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी आणि जखमींना योग्य वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे विनंती केली आहे.
तेलंगणा सरकारकडून तातडीने उपाययोजना
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनीही या भयंकर अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मुख्य सचिव आणि डीजीपी यांना तातडीने माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, मदत कार्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि सौदी दूतावासाशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत.