क्वालालंपूर; वृत्तसंस्था : मलेशियातील 20 इस्लामिक वेल्फेअर होम्समध्ये सुमारे 402 मुलांचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी छापेमारी करत या मुलांची सुटका केली. यामध्ये 1 ते 17 वयोगटातील 201 मुले आणि 201 मुलींचा समावेश आहे. हे सर्व होम्स ग्लोबल सर्व्हिसेस अँड बिझनेस होल्डिंग्स (जीआयएसबी) नावाच्या इस्लामिक ग्रुप संबंधित आहेत. याप्रकरणी 171 संशयितांना अटक केली असून यामध्ये 105 महिलांचाही समावेश आहे.
402 वेल्फेअर होम्समध्ये मुलांच्यावर लैंगिक अत्याचार होत असल्याची माहिती मिळाली. इतकेच नाही तर एका मुलांकडून दुसर्या मुलांचेही लैंगिक शोषण केले जात असे. अटक केलेल्यांमध्ये धार्मिक शिक्षकांसह अनेकांचा समावेश आहे. त्यांच्यावर या मुलांचे शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी होती. होम्समधील मुले आजारी पडली तरी त्यांच्यावर उपचार केले जायचे नाहीत. एखादे मुल गंभीर आजारी पडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले जात असे. पाच वर्षांपेक्षा मोठ्या मुलाने चूक केल्यास त्याला गरम चमच्याने डागणी दिली जायची, असे मलेशियाचे इन्स्पेक्टर जनरल रजाउद्दीन हुसैन यांनी सांगितले. ग्लोबल इखवानने मुलांचे लैंगिक शोषण तर केलेच त्याचबरोबर दान मिळण्यासाठी धार्मिक भावनांचाही वापर केला जायचा.
ग्लोबल इखवान ग्रुपचे किराणा, बेकरी, रेस्टॉरंट, पोल्ट्री फार्म आणि पर्यटनासह अनेक व्यवसाय आहेत. त्यांच्या 20 देशांतील शाखांमध्ये पाच हजारहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या ग्रुपची स्थापना अशीर मोहम्मदने केली होती. तो मलेशियातील एक धार्मिक नेता आहे. अल्लाहने मला चमत्कारी शक्ती दिल्या असल्याचा दावा केला होता.