

जीनिव्हा; वृत्तसंस्था : जगातील 40 विद्यार्थी मातृभाषेतून शिक्षण मिळण्यापासून वंचित असल्याची माहिती युनेस्कोने दिली आहे. ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग (जीईएम) टीम या युनेस्कोअंतर्गत कार्यरत असणार्या संस्थेने मातृभाषेतील शिक्षणाचा आढावा घेणारा अहवाल आंतरराष्ट्रीय माृतभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारित केला आहे.
विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये तर मातृभाषणेतून शिक्षण न मिळण्याचे प्रमाण 90 टक्क्यांहून अधिक आहे. शिक्षणात मातृभाषेच्या महत्त्वाबद्दल जागरूकतेनंतरही, बहुभाषिक धोरणे स्वीकारण्याचा वेग मंद आहे.
वाढत्या स्थलांतरामुळे जगभरातील वर्ग अधिकाधिक भाषिकद़ृष्ट्या वैविध्यपूर्ण होत आहेत आणि 31 दशलक्षांहून अधिक विस्थापित युवकांना शिक्षणामध्ये भाषिक अडथळ्यांना सामोरे जावे लागते.
2010 ते 2022 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेत घट झाली आहे. घरात बोलणार्या भाषेत विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाल्यास वाचन संस्कृती वाढू शकते. मात्र, घरातील आणि शाळेतील भाषा वेगळी असल्यास शैक्षणिक नुकसानीचा धोका संभवतो, असे या अहवालात म्हटले आहे.
प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता, स्थानिक भाषेचा अभाव, अपुरे शिक्षण साहित्य आणि स्थानिक समुदायांचा विरोध यांसारख्या आव्हानांमुळे जगभरातील विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळण्यात अडचणी येत असल्याचे यामध्ये म्हटले आहे.
युवकांच्या जीवनावर तंत्रज्ञानाचा मोठा प्रभाव पडला तसेच कोव्हिड-19 चाही परिणाम झाला. शिक्षणाच्या पातळीमध्ये विशेषतः वाचन आणि गणितात मोठी घट झाली आहे. मातृभाषेत शिक्षण न मिळाल्यामुळे विद्यार्थ्याना या काळात अधिक फटका बसला आहे.
बहुभाषिक विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत. शालेय नेतृत्वाच्या व्यावसायिक मानकांमध्ये, विविध भाषिक गटांमध्ये संवाद वाढवण्यासाठी समन्वय हवा.
अनेक देशांमध्ये वसाहतकालीन वारसा आणि विस्थापनामुळे परकीय भाषा शिक्षणात लागू केल्या गेल्या. यामुळे मातृभाषेकडे दुर्लक्ष करण्यात आले. आधुनिक स्थलांतर पद्धतींमुळे नव्या भाषा वर्गात आल्या आहेत.
* शिक्षकांना त्यांच्या मातृभाषेत आणि दुसर्या भाषेत पारंगत करण्याची खात्री करणे.
* शाळेच्या अध्यापनाच्या भाषेत निपुण असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करणे.
* प्रारंभिक बालपणीच्या शिक्षकांना सांस्कृतिक आणि भाषिकद़ृष्ट्या सर्वसमावेशक अध्यापनपद्धती वापरण्यासाठी प्रशिक्षण देणे.