

लंडन ः वृत्तसंस्था ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या निधनानंतर किंग चार्ल्स तृतीय यांना ब्रिटनचे नवे सम्राट म्हणून घोषित करण्यात आले आहे. लंडनच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये शनिवारी याविषयीचा राज्यारोहण समारंभ पार पडला. किंग चार्ल्स (तृतीय) हे 73 वर्षीय असून, ते महाराणी एलिझाबेथ यांचे सर्वात मोठे चिरंजीव आहेत. महाराणी एलिझाबेथ यांचे निधन झाल्यामुळे राज्याची सूत्रे किंग चार्ल्स (तृतीय) यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.
महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर 24 तासांच्या आत पारंपरिक पद्धतीने राज्याभिषेकासंदर्भात खास परिषद बोलावण्यात येते. मात्र, महाराणींचे निधन झाल्याची घोषणा करण्यास विलंब झाल्याने ही परिषद शुक्रवारी बोलावण्यात आली नव्हती. त्यामुळे किंग चार्ल्स यांच्याकडे सम्राटपदाची सूत्रे सोपवण्याचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. किंग चार्ल्स (तृतीय) यांना किंग म्हणजेच सम्राट म्हणून घोषित करण्यासाठीची प्रक्रिया अनेक टप्प्यात पार पडली. सर्वसाधारणपणे या कार्यक्रमात 700 हून अधिक जण सहभागी होतात; पण यावेळी हा कार्यक्रम अत्यंत कमी वेळात आयोजित करण्यात आल्यामुळे त्यात अत्यंत निवडक लोकांचा समावेश होता. या कार्यक्रमात नव्या सम्राटांनी सत्ता सांभाळल्यानंतर कोणते बदल केले जातील, हेही निश्चित करण्यात आले.
महाराणींच्या निधानानंतर ध्वज अर्ध्यावर आणण्यात आले होते. मात्र, चार्ल्स यांची नवे सम्राट म्हणून घोषणा केल्यानंतर हे ध्वज पुन्हा फडकावण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रथमच टी.व्ही.वर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. खास परिषदेत कॅबिनेट मंत्री, न्यायाधीश आणि चर्च ऑफ इंग्लंड आदी मान्यवरसहभागी झाले होते. या परिषदेत किंग चार्ल्स यांनी महाराणींच्या निधनाची माहिती दिली. तसेच चर्च ऑफ स्कॉटलंडच्या संरक्षणाची प्रतिज्ञाही घेतली. यावेळी किंग चार्ल्स म्हणाले, माझ्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पडण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
चार्ल्स हे सम्राट झाल्यानंतर त्यांची पत्नी कॅमिला 'क्वीन कन्सोर्ट' बनल्या आहेत. तसेच चार्ल्स यांच्या मोठ्या मुलाला विल्यिमला प्रिन्स ऑफ वेल्सची उपाधी बहाल करण्यात आली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन हे महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.
नवे सम्राट चार्ल्स यांना मुकुटासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. कारण, त्यासंबंधीच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी मोठा अवधी लागतो. महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनाही याकरिता जवळपास 16 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली
होती.
गेल्या अनेक दशकांपासून ब्रिटनच्या नोटा आणि नाण्यांवर महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. जगातील डझनभर देशातील नोटा आणि नाण्यांवर महाराणींचा फोटो आहे. महाराणींच्या निधनानंतर ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इतर देशांना आपले चलन बदलण्यास वेळ लागणार आहे. आता या नोटा आणि नाण्यांवर महाराणींऐवजी किंग चार्ल्स यांचा फोटो असेल. हे लगेच होणार नाही. सध्याच्या स्थितीत महाराणींचा फोटो असलेल्या नोटा आणि नाणी कायदेशीररीत्या वैध असतील, असे बँक ऑफ इंग्लंडने जाहीर केले आहे.