

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था जगाच्या नकाशावर सर्वाधिक 14 देशांसोबत सीमा लागून असलेला चीन हा एकमेव देश आहे. विस्तारवादी धोरणामुळे अन्य देशांच्या सीमेलगतच्या जमिनीवर, समुद्रावर चीन सतत डोळा ठेवून असतो. अनेक देशांच्या जमिनीवर चीनने तसा कब्जा केलेलाही आहे. चीनच्या सीमेला लागून असलेले भारतातील लडाख, अरुणाचल आदी प्रदेश व नेपाळ तसेच भुतान या देशांतील भूभागावर कब्जा करण्याच्या चीनच्या धोरणाला 'फाईव्ह फिंगर पॉलिसी' म्हणून ओळखले जाते. अर्थात, चीन आपले हे धोरण अधिकृतपणे कधीही जाहीर करत नाही, हा भाग वेगळा. पाकव्याप्त काश्मीरमधील (भारताच्या मालकीचे) हुंजासह काही भाग पाकने चीनला परस्पर दिले आहेत. थोडक्यात काय तर ड्रॅगनचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. चीनने 1962 च्या युद्धात भारतातील काश्मीरअंतर्गत येणार्या अक्साई चीनवर कब्जा जमविलेला आहे. जून 2020 मध्ये गलवान खोर्यात चीनने पुन्हा घुसखोरी केली होती, पण शूर भारतीय जवानांनी ती हाणून पाडली होती. भारतासोबत शांतता चर्चा सुरू असतानाच ड्रॅगनने आपले डोळे सध्या तैवानकडे फिरविले आहेत.
चीन सीमेला लागून असलेले देश भारत, अफगाणिस्तान, भुतान, कझाकिस्तान, किर्गिझीस्तान, लाओस, द. मंगोलिया, म्यानमार, नेपाळ, उत्तर कोरिया, पाकिस्तान, रशिया, ताजिकीस्तान, व्हिएतनाम.
14 देशांसोबत सीमा
22 देशांशी सीमावाद
18 देशांसह सध्या वाद
97,06,961 चौरस किलोमीटरचा चीन
22,117 कि.मी. सीमा 14 देशांना लागून
1949 : कम्युनिस्ट पक्षाच्या ताब्यात चीन
1950 : विस्तार सुरू, तिबेट, पूर्व तुर्कस्तान, द. मंगोलियावर कब्जा
1997 : हाँगकाँगवर कब्जा
1999 : मकाऊवर ताबा, नंतर या धोरणात आजतागायत सातत्य
तैवान, पूर्व तुर्कस्तान, तिबेट, दक्षिण मंगोलिया, हाँगकाँग, मकाऊ हे देश/क्षेत्र चीन आपल्या अधिकृत नकाशात आपल्या मालकीचे असल्याचे दाखवतो. चीनने अशाप्रकारे जवळपास 41,13,709 चौ.कि.मी. जमिनीवर कब्जा केलेला आहे. चीनच्या नकाशातील 43 टक्के भाग हा बळकावलेला भाग आहे! चीन 35 लाख चौ.कि.मी.च्या दक्षिण चीन समुद्रावर आपला हक्क सांगतो. फिलिपाईन्स, इंडोनेशिया, जपान, द. कोरिया, सिंगापूर, ब्रुनेईशी चीनचे वाद आहेत..
तैवान : कधी जपान, तर कधी चीनची मालकी या देशावर असे. 73 वर्षांपूर्वी 1949 मध्ये तैवान स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. चीन त्यानंतर सातत्याने या देशावर आपली मालकी सांगत आला आहे.
फिलिपाईन्स : फिलिपाईन्सच्या मालकीचे स्कार्बोरो रीफ बेटे आमच्या मालकीची आहेत, असा चीनचा दावा आहे. अमेरिकेने या वादातही फिलिपाईन्सला पाठिंबा जाहीर केला आहे.
इंडोनेशिया : चीन आणि इंडोनेशियात सागरी क्षेत्राबद्दल वाद आहेत. नटून बेटांसह दक्षिण चीन समुद्रातील इंडोनेशियाच्या हद्दीत येणार्या एका मोठ्या भागावर ताबा मिळवू पाात आहे. अनेकदा चीनने घुसखोरीही केली आहे.
व्हिएतनाम : समुद्रातील पॅरासेल, स्प्रॅटली ही बेटे व्हिएतनामची नसून, आमच्या मालकीची आहे, असे चीन सांगत आला आहे. शिवाय दक्षिण चीन समुद्रातील भागाबाबतही दोन्ही देशांदरम्यान वाद आहेत.
मलेशिया : चीन आणि मलेशियातही बेटांच्या मालकीवरून वाद आहेत. चीनने अनेकदा मलेशियाच्या हद्दीतही घुसखोरी केली आहे. सन 2020 मध्ये चीनने जेव्हा लष्करी हस्तक्षेप केला तेव्हा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने आपापल्या युद्धनौका पाठवून चिनी सैन्याला हुसकावून लावले होते.
जपान : सेनकाकू आणि रयुकू बेटांच्या समूहांच्या मालकीवरून चीन आणि जपानमध्ये वाद आहेत. या बेटांवर जपानला घाबरवून सोडण्यासाठी अनेकदा चीनने आपले नौदल समुद्रात उतरविलेले आहे.
लाओस : तैवानप्रमाणेच लाओस हा देशही आमच्या मालकीचा आहे, असा चीनचा दावा आहे.
दक्षिण कोरिया : दक्षिण चीन समुद्रातील सोकोट्रा रॉकवरून दोन्ही देशांत संघर्ष आहे. हा भाग आपला विशेष 'इकॉनॉमिकल झोन' असल्याचे दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे. चीन मात्र अधूनमधून हा भाग आमचा असल्याचे सांगून घुसखोरी करत असतो.
नेपाळ : नेपाळचा काही भाग हा तिबेटचा असल्याचे सांगून चीन गोंधळ उडवत असतो. चालू वर्षात जून महिन्यात नेपाळमधील रुई या गावावर चीनने कब्जा केला आहे.
भुतान : भुतानच्या पूर्वेकडून एका मोठ्या भूभागावर चीन आपली मालकी सांगत आला आहे. 5 जुलै 2020 रोजी भुतानशी सीमावाद असल्याचे चीनने अधिकृतपणे जाहीरही केले होते.
दक्षिण मंगोलिया : द. मंगोलिया हा एक स्वायत्त भाग आहे. त्यावरही चीन मालकी
सांगतो. 2015 मध्ये त्यावरून दोन्ही देशांतील सैन्य समोरासमोरही आले
होते.
म्यानमार : या देशाशी चीनचा 1960 मध्ये एक करार झाला. त्यानुसार 2185 किलोमीटर सीमेवर दोन्ही बाजूंनी संमती झाली, पण म्यानमारकडून चीनविरोधात सतत आरोप होत असतात.
तिबेट : सध्या चीनच्या ताब्यात. चीनने 1950 मध्ये या देशावर ताबा मिळविला. तत्कालीन तिबेटी बौद्ध धर्मगुरूदलाई लामा आणि त्यांच्या अनुयायांना भारतात शरण घ्यावी लागली होती.
पूर्व तुर्कस्तान : चीनने 1949 मध्ये पूर्व तुर्कस्तानवर कब्जा केला. चीन या भागाला शिनजियांग म्हणतो. या भागात मोठी लोकसंख्या उईघर मुस्लिमांची होती, पण हान वंशियांना वसवून व मुस्लिमांचा छळ करून चीनने येथे वरचष्मा कायम केला आहे.