

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील मिलवॉकी येथे दरोड्याच्या उद्देशाने अज्ञात हल्लेखोरांनी एका २७ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या केली. गम्पा प्रवीण कुमार (Gampa Praveen) असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून तो तेलंगणाच्या (Telangana) रंगारेड्डी जिल्ह्यातील केशमपेट मंडल येथील रहिवासी आहे. तो विस्कॉन्सिन विद्यापीठात डेटा सायन्समध्ये एमएस शिक्षण घेत होता. ''तो शिक्षणादरम्यान एका स्थानिक दुकानात अर्धवेळ काम करत होता. दोन महिन्यांत त्याचे शिक्षण पूर्ण होणार होते," असे त्याची बहीण जी गायत्री हिने सांगितले. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
बुधवारी सकाळी प्रवीणच्या मृत्यूची माहिती कळताच त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्याचे वडील गम्पा राघवुलू यांनी सांगितले की, त्यांना पहाटे २.५५ वाजता एक व्हॉट्सअॅप कॉल आला. पण या कॉल मिसिंगनंतर एक व्हॉइस मेसेज आला आणि कॉल परत करण्यास सांगण्यात आले.
"आम्हाला कॉलवर काही उत्तर मिळाले नाही. आम्ही त्याच्या नंबरवर कॉल केला तेव्हा कोणीतरी उत्तर दिले की त्यांना माझ्या मुलाचा फोन सापडला आहे. त्यांनी त्याची जन्मतारीख विचारली, जी असामान्य वाटली. म्हणून आम्ही कॉल डिस्कनेक्ट केला. त्यानंतर आम्ही त्याच्या मित्रांशी संपर्क साधला," असे राघवुलु यांनी सांगितले. प्रवीणच्या मित्रांना कळाले की तो ज्या दुकानात कामाला होता तिथे दरोडेखोर घुसले होते. यादरम्यान त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्याला गोळी लागली आणि यात त्याचा मृत्यू झाला," असे राघवुलू म्हणाले.
गम्पा प्रवीण कुमार याने हैदराबादमध्ये बीटेक शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ऑगस्ट २०२३ मध्ये अमेरिकेला गेला होता. तो डिसेंबर २०२४ मध्ये मायदेशी येऊन पुन्हा २० जानेवारी २०२५ रोजी अमेरिकेला रवाना झाला होता. त्याचे चार महिन्यांत शिक्षण पूर्ण होणार होते. त्यानंतर तो नियमित नोकरी करणार होता," असे त्याचे वडील राघवुलू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या घटनेबाबत माहिती देताना भाजप नेते एन रामचंदर राव यांनी सांगितले, "अमेरिकेतील एका दुकानात काम करणाऱ्या तेलंगणातील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील सरकारने किमान कायदेशीर स्थलांतरितांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या घटनेवरून असे दिसून येते की अमेरिकेत अजूनही वर्णद्वेष सुरू आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात भारतीयांचे योगदान असूनही वर्णद्वेष वाढत आहे. या प्रकरणी अमेरिकन सरकारने कठोर पावले उचलायला हवीत.", असे त्यांनी नमूद केले आहे.