अफगाणिस्तान बळकावल्यानंतर तालिबान्यांनी महिलांचे हक्क आणि अधिकार पायदळी तुडवले आहेत. याचवेळी येथील अल्पसंख्याक समुदायालाही लक्ष्य केले जात आहे. तालिबान्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. एका गावात हजारा समुदायातील नऊ जणांची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका नागरिकाच्या हवाल्यानुसार अॅमनेस्टी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने ही बाब जगासमोर उघड केली आहे. दुसरीकडे पंजशीर खोर्यात तालिबानने बळकावलेला पुल-ए-हिसार जिल्हा स्थानिक लढवय्यांनी आपल्या ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. पंजशीरमधील अहमदशहा मसूद यांचा मुलगा अहमद मसूद यांच्याशी तालिबान्यांनी वाटाघाटी सुरू केल्या आहेत.
मानवी हक्क पायदळी तुडवण्याचे प्रकार तालिबान्यांकडून दररोज होत आहेत. गझनीतील मुंदारख्त या गावात हजारा समुदायातील 9 जणांची हत्या करण्यात आली. जुलैपासून आतापर्यंत तालिबान्यांनी अल्पसंख्याक हजारा समुदायाला लक्ष्य केले आहे. त्या तुलनेत 9 लोकांची झालेली हत्या ही खूप छोटी घटना आहे, असे 'अॅमनेस्टी'ने अहवालात म्हटले आहे. त्यावरून आणखी किती हत्याकांड झाले असावेत, असा तर्क लावण्यात येत आहे.
या हत्याकांडाबद्दल एका नागरिकाची 'अॅमनेस्टी'ने मुलाखत घेतली. त्यानुसार, 3 जुलैला अफगाणी सैन्य आणि तालिबान्यांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. त्यामुळे भयकंपित ग्रामस्थांनी गाव सोडले. उन्हाळ्याच्या दिवसांत आसरा घेतो, तेथे आम्ही सर्वजण आलो. गावातील सर्व 30 कुटुंबातील लोक पळून आलो होतो. आमच्याकडे खाण्या-पिण्याचे साहित्य उरले नाही. 4 जुलैच्या सकाळी गावातून अन्नधान्य आणण्यासाठी नऊजण गेले. त्यात 5 पुरुष आणि 4 महिला होत्या. गावात आलो तर आमचे संपूर्ण गाव तालिबान्यांनी लुटले होते. तालिबानी कदाचित आमची वाटच बघत होते. तालिबान्यांनी क्रौर्याच्या परिसीमा गाठल्या आहेत. आपल्या हुकुमतीखाली आलेल्या अनेक भागांत हे हत्याकांड सुरू आहे.
तालिबानच्या राजवटीखाली वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांवर संकट घोंघावत असल्याचा हा ढळढळीत पुरावा आहे. तालिबानने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचा आदर करावा आणि सर्व अफगाणांची सुरक्षा सुनिश्चित करावी. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही तातडीचा ठराव करून तेथील अल्पसंख्याकांसह सर्व नागरिक सुरक्षित राहतील, यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन अॅमनेस्टी इंटरनॅशनलचे सरचिटणीस अॅग्नेस कॅलामार्ड यांनी म्हटले आहे.
पत्रकार सापडला नाही म्हणून नातेवाईकाला ठार केले
नाटो आणि अमेरिकेसाठी काम करणारेही तालिबानकडून लक्ष्य केले जात असून, जर्मनीच्या डायचे वेले या माध्यम समूहाचा पत्रकार सापडला नाही म्हणून त्याच्या नातेवाईकाची गोळी घालून हत्या करण्यात आली. डायचे वेलेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या गोळीबारातून एक नातेवाईक वाचला आहे.
वर वर नरमल्याचे दाखवत असले तरी अमेरिकेला मदत करत असल्याची शंका असलेल्या नागरिकांच्या घरांची तालिबान्यांकडून झडती घेतली जात आहे. निर्दयीपणे माणसे मारली जात आहेत.
दरम्यान, तालिबानने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तालिबानी बंडखोरांना कुणाच्याही घराची झडती घेऊ नये, असे आमच्या लोकांना सांगितल्याचे तालिबानने म्हटले आहे. तथापि, तालिबान्यांचे हे वक्तव्य किती फोल आहे, ते अनेक हिंसक घटनावरून सिद्ध होत आहे.
जर्मन नागरिकावर गोळीबार
अनेक देशांचे नागरिक अद्याप अफगाणिस्तानात अडकले आहेत. त्यात जर्मन नागरिकांचाही समावेश आहे. विमानतळाकडे येणार्या एका जर्मन नागरिकावर तालिबान्यांनी गोळीबार केला. त्यात तो जखमी झाला आहे. जर्मन सरकारचे प्रवक्ते उलिक डेमर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, ही व्यक्ती किंवा घटनेबद्दल अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.
भारतीय दूतावासांची तोडफोड
नवी दिल्ली : कोणत्याही देशाचे दूतावास किंवा तेथील अधिकारी, कर्मचार्यांना त्रास देणार नाही, असे तालिबानने जाहीर केले असले तरी तालिबान्यांनी भारताच्या दोन वाणिज्य दूतावासांची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानच्या दहशतवाद्यांनी बुधवारी कंदाहार आणि हेरात येथील भारतीय वाणिज्य दूतावासांची तोडफोड केली. दूतावासात घुसून तेथील कपाटांमधील कागदपत्रे विस्कटली आणि दूतावासात पार्क केलेली वाहनेही काढून घेतली.
एका वरिष्ठ अधिकार्याने एनडीटीव्हीला सांगितले, आम्हाला हे अपेक्षित होते. त्यांनी ठिकाण शोधले आणि कागदपत्रे शोधली आणि आमची पार्क केलेली वाहनेही काढून घेतली.
या हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी तालिबानने भारताने आपल्या काबूल दूतावासातून मुत्सद्यांना परत बोलावण्याची गरज नाही. तसेच अधिकारी कर्मचार्यांना काहीही धोका पोहोचवणार नाही, असे म्हटले होते. या दोन दूतावासांतील हल्ल्यामुळे मात्र तालिबान्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. काबूलमधील दूतावासासह अफगाणिस्तानात भारताची कंदाहार, हेरात आणि मजार-ए-शरीफमध्ये वाणिज्य दूतावास आहे. तालिबानने हा प्रदेश ताब्यात घेण्याच्या काही दिवस आधी ती बंद केले आहेत.