स्विस बँकेतील ‘ते’ 300 कोटी कुणाचे? : तीन वर्षे खातेदारांची प्रतीक्षा | पुढारी

स्विस बँकेतील ‘ते’ 300 कोटी कुणाचे? : तीन वर्षे खातेदारांची प्रतीक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

संसदेत आणि बाहेरही स्विस बँकेतील काळ्या पैशांवरून  सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होतात. मात्र, आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे स्विस बँकेतील  काही खाती निष्क्रिय आहेत. अशा निष्क्रिय खात्यातील रक्‍कम 300 कोटींवर आहे.  या रकमेवर दावा सांगण्यासाठी अद्याप कुणीही समोर आलेले नाही. गेल्या तीन वर्षांपासून बँकेला या खातेदारांची अथवा त्यांच्या वारसदारांची प्रतीक्षा आहे. आणखी दोन वर्षे या खात्यांवर कोणीही दावा सांगितला नाही, तर ती नियमानुसार गोठवली जाणार असल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले.

स्विस बँकेतील खातेदारांची माहिती गोपनीय ठेवली जाते. मात्र, डिसेंबर 2015 मध्ये पहिल्यांदाच बँकेने खातेदारांची यादी प्रसिद्ध केली.  बँकेने जाहीर केलेल्या आकड्यानुसार, सहा भारतीय खाती निष्क्रिय आहेत. परंतु, ते सध्या भारतात रहात नाहीत.  या खात्यात 300 कोटी इतकी रक्‍कम आहे. यादीत समावेश असलेली ही खाती 2020 पर्यंत ठेवणार आहेत, तोपर्यंत या खात्यांवर कोणीही दावा न केल्यास त्यानंतर ही खाती गोठवण्यात येणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

या यादीत अन्य खातीही आहेत. गेल्या कित्येक वर्षांत त्यावर कोणीही दावा सांगितलेला नाही. यात स्वित्झर्लंडमधील लोकांचीच मोठी संख्या आहे. तसेच जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशांतील नागरिकांचा समावेश आहे.

  स्वीस बँक आणि त्यातील भारतीयांच्या ठेवी हा राजकारणाचा कायमच प्रचाराचा मुद्दा ठरलेला आहे. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काळ्या पैशाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. वास्तविक स्वीस बँक कधीही आपल्या खातेदारांची माहिती जाहीर करीत नाही, मात्र डिसेंबर 2015 मध्ये बँकेने पहिल्यांदा खातेदारांची माहिती जाहीर केली. बँकेने जाहीर केलेल्या आकड्यानुसार, सहा भारतीय खाती निष्क्रिय आहेत. परंतु, ते सध्या भारतात रहात नाहीत.  या खात्यात 300 कोटी इतकी रक्‍कम आहे. आता ही खाती कुणाची आहेत, ते राजकारणी आहेत की उद्योगपती, नोकरशहा आहेत की बॉलिवूडचे चमचमते तारे या चर्चेचा ऊत येणार आहे. त्या खात्यातील रक्‍कम काढण्यास 2020 सालापर्यंत कोण येतो, याकडेच आता लक्ष लागून राहणार आहे. 

Back to top button