सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन
मोबाईलमध्ये आधारचा नंबर सेव्ह केल्याच्या चर्चेचे गुऱ्हाळ बंद व्हायच्या आधीच आता गुगलकडून तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तुम्ही मोबाईल घेऊन ज्या ठिकाणी जाता त्याची सर्व माहिती गुगल ठेवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
ॲन्ड्रॉइड फोनमध्ये गुगलची सर्विस वापरली जाते. मुळात ऑपरेटिंग सिस्टीम गुगलची असल्याने जवळपास मोबाईलवर पूर्ण गुगलचाच ताबा असतो. त्यामध्ये काही सेटींग्जचा वापर करुन गुगल तुमच्या फोनची सर्व माहिती रेकॉर्ड करुन ठेवते. याबाबत प्रिंस्टन येथे कॉम्प्युटर सायन्सच्या संशोधकांनी सांगितले.
गुगल अनेकवेळा तुमच्या लोकेशनची माहिती वापरण्याची परवानगी मागते. मॅपसारखे ॲप वापरायचे असेल तर त्यासाठी लोकेशन सेटींग ऑन करणे आवश्यक असते. जेव्हा आपण ते ॲप वापरतो तेव्हा ॲपच्या टाईमलाईनवर यापूर्वी आपण जी ठिकाणे शोधली असतील ती दिसतात. अशा प्रकारची माहिती दुसऱ्याला असणे आपल्या प्रायव्हसीला धोकादायक आहे. यासाठी गुगलने लोकेशनची पूर्ण माहिती देणे बंद करणारा पर्याय दिला आहे. याबाबत गुगलने सांगितले आहे की, लोकेशन सेटींग कधीही बंद करता येईल. ज्यामुळे माहिती सेव्ह होणे बंद होईल. त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी जाल ती माहिती सेव्ह होणार नाही.
मात्र, गुगलने सांगितल्यानुसार होत नसल्याने युजर्स चिंतेत पडले आहेत. लोकेशन हिस्ट्री बंद केल्यानंतरही गुगलकडून परस्पर लोकेशनची माहिती सेव्ह केली जाते. ज्यावेळी गुगल मॅप ओपन केले जाते त्यावेळी स्नॅपशॉट काढला जातो. तसेच हवामानाचा अंदाज व त्याबाबतची माहिती देणाऱ्या ॲपद्वारे लोकेशन सेव्ह केले जाते.
याशिवाय इतर काही ॲप्समध्येही तुमच्या लोकेशनची माहिती सेव्ह होते. त्यामुळे तुम्ही जरी लोकेशन सेटींग ऑफ केलेत तरीही गुगलची तुमच्यावर नजर राहतेच. सध्या यामुळे जगभरातील २ अब्ज अँड्रॉईड युजर्सच्या लोकेशनची माहिती गुगलला मिळते.
कोणत्या ॲप्समधून कोणती माहिती गोळा करते गुगल
गुगल क्रोम : तुम्ही इंटरनेटवर काय सर्च केले याची माहिती
युट्यूब : कोणते व्हिडिओ अपलोड केले आणि पाहिले
मॅप्स : कधी कोणत्या ठिकाणी गेलात आणि काय सर्च केले
हँगआऊट : कोणाबरोबर काय चर्चा केली
जीमेल : संपर्क आणि इमेलच्या माध्यमातून माहिती गोळा केली जाते.
आपले लोकेशन सेटींग बंद करुन प्रायव्हसी सेटींग बदला. तसेच शक्य असल्यास गुगल अकाउंटला आपल्या कोणत्या माहितीचा वापर करण्याची परवानगी दिली आहे ते तपासा. त्यानंतर कॉन्टॅक्ट आणि इतर माहिती गुगलला देणे टाळा.