खशोग्गींचा मृतदेह अॅसिडमध्ये विरघळून गटारीत सोडला! | पुढारी

खशोग्गींचा मृतदेह अॅसिडमध्ये विरघळून गटारीत सोडला!

अंकांरा (तुर्कस्तान) : पुढारी ऑनलाईन

सौदी अरेबियाचे प्रतिभावन पत्रकार जमाल खशोग्‍गी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एका धक्कादायक माहिती समोर आली आहे. खशोग्गी यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात अाले अाणि त्यानंतर ते ॲसिडमध्ये विरघळून गटारीत पाण्याच्या रुपाने सोडून देण्यात अाले, असे वृत्त तुर्कस्तानमधील सरकार समर्थक एका वृत्तपत्राने दिले आहे. 

या वृत्तामुळे खशोग्गी यांच्या हत्येचा प्रकार म्हणजे क्रौर्याची परिसीमा गाठणारा आहे, असेच निष्पन्न होते. खशोग्गींच्या हत्या प्रकरणी इस्तंबूल येथील सौदी अरेबियाच्या दुतावासाजवळील गटारातून नमुने घेण्यात आले होते. त्यातून खशोग्गींच्या हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी ॲसिडचा वापर झाला असल्याचे वृत्त देण्यात आले आहे.

२ ऑक्टोबर रोजी तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथील सौदी अरेबियाच्या दुतावासात गेल्यानंतर खशोग्गी यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यांचा सात मिनिटांच्या आत मृत्यू झाला. एवढेच नाही तर २२ मिनिटांच्या आत त्यांच्या शरिराचे तुकडे करण्यात आले, अशी माहिती याआधी समोर आली होती. आता त्यांच्या हत्येप्रकरणी नवीन खुलासा समोर आला आहे.

खशोग्गी २ ऑक्टोबर रोजी शेवटचे इस्तंबूल दुतावासात दिसले होते. त्यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह सापडलेला नाही. खशोग्गी यांची हत्या आम्ही केली नसल्याचा खुलासा अनेकवेळा केल्यानंतर अखेर सौदीने ही हत्या ‘rogue’ ऑपरेशन अंतर्गत झाल्याची कबुली दिली आहे. 

दरम्यान, तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तायीप इर्डोगन यांनी खशोग्गी यांची हत्या सौदी सरकारने केल्याचा आरोप केला आहे. तर काही अधिकाऱ्यांनी या हत्येप्रकरणी सौदीचे क्राऊन प्रिन्स महमंद बिन सलमान यांच्याकडे बोट दाखविले आहे. खशोग्गी यांच्या हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी सौदी अरेबियाने इस्तंबूल येथे दोन तज्ज्ञांना पाठविले होते, अशी माहिती तुर्कस्तानमधील सरकारी अधिकाऱ्यांनी याआधी दिली आहे.

सेंगीज यांच्याकडून दु:ख व्यक्त…

खशोग्गी यांच्या हत्येप्रकरणी नवीन खुलासा समोर आल्यानंतर त्यांची तुर्कस्तानमधील प्रेयसी हॅटिस सेंगीज यांनी ट्विटरच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहे. खशोग्गी यांचा मृतदेह ॲसिडने नष्ट केल्याचे समजल्यावर खूप दु:ख झाले, असे त्यांनी म्हटले आहे. खशोग्गी हे सेंगीज यांच्या लग्न करणार होते. त्यासाठी दस्तावेज मिळवण्यासाठी तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथील दुतावासात गेले होते. याचवेळी त्यांची हत्या करण्यात आली.

 

Back to top button