Destroyed Sneaker : फुकटात दिलं तरी काेणी घेणार नाही; पण बुटांची किंमत तब्बल दीड लाख! | पुढारी

Destroyed Sneaker : फुकटात दिलं तरी काेणी घेणार नाही; पण बुटांची किंमत तब्बल दीड लाख!

पुढारी ऑनलाईन डेस्क : एखादी कंपनी अत्यंत खराब झालेले, जागोजागी फाटलेले, कुजलेले बूट लाखो रुपयांना विकत आहे, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं किंवा तुम्ही विकत घ्या म्हटलं तर तुम्ही घ्याल का? ते बुट तुम्ही घालाल का? नाही ना? पण, हो हे खरंय की, बुटांसाठी प्रसिद्ध असणारा ‘बालेंसियागा’ ब्रॅण्डने ‘पेरिस स्नीकर’ कलेक्शन नावाने काही बूट नुकतेच लाॅन्च केले आहे. त्याच्या किंमती ४८ हजार ते १ लाख ४४ हजारापर्यंत आहेत. विशेष हे की, बूट जितके जास्त खराब, तितकी त्याची किंमत जास्त… आश्चर्य वाटलं ना?

बालेंसियागा ब्रॅण्डच्या खराब बुटांच्या विचित्र लॅन्चिंगमुळे सोशल मीडियावर युजर्सने प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. सर्वात जास्त घाणेरडे, जागोजागी कुरतडलेले आणि फाडलेले, कापलेले, ओरखडलेले बूट असतील तर त्या बुटांच्या दीड लाखांपर्यंत किमती आहेत. अहो, इतकंच नाही तर कंपनीने लिमिटेड एडिशन असून केवळ १०० जोड कंपनीने तयार केलेली आहेत.

असं सांगितलं जात आहे की, कंपनीचा हा ब्रॅण्डींग जाहिरातीचा भाग आहे. यातून ‘आयुष्य तुमच्यासोबत स्नीकर म्हणजेच बूट असतील’, असा सांगण्याचा उद्देश आहे. बालेंसियागा ब्रॅण्डने आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबद्दल सांगितले आहे की, “मध्य-शताब्दीच्या ऍथलेटिसिझमसह आणि ऑन कॅज्युअल पोशाखांसह एक क्लासिक डिझाइन केलेले हे बूट आहेत. जे काळ्या, पांढर्‍या किंवा लाल रंगात असतात. ज्याचा लुकवर परिणाम होतो. ते जाणीवपूर्वक असे बनविण्यात आली आहेत.”

विचित्र बुटांच्या कलेक्शनमुळे ट्विटर युजर्सदेखील आश्चर्यचकीत झाले आहेत. हे विचित्र बूट पाहून युजर्सना प्रतिक्रिया देताना थांबत नाहीत. “अशी घाणेरडी बुट तुम्ही खरंच घालाल का?”, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. काही लोकांसाठी आतापर्यंतच्या सर्वात खराब बुटांपैकी हे बूट आहेत, असं सांगण्यात येत आहे. काही जणांनी कंपनीचे बुटांची पोस्ट शेअर करत उपहासात्मक लिहिलं आहे की, “जगातील सर्वात लेटेस्ट बूट”, असं लिहिलं आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button