शकीरावर तब्बल ११८ कोटी कर चोरीचा आरोप | पुढारी

शकीरावर तब्बल ११८ कोटी कर चोरीचा आरोप

बार्सिलोना : पुढारी ऑनलाईन

सुप्रसिद्ध गायिका, डान्सर शकीराचे नुसते नाव जरी घेतले तरी डोळ्यासमोर येतो तो तिचा फीफा वर्ल्डकपच्या  ‘वाका वाका’ गाण्यावरील व्हिडिओ. शकीराने २०१० मध्ये फीफा वर्ल्डकपचे थीम गाणे ऑफिशिअली गायले आणि ते प्रचंड सुपरहिट झाले होते. हे गाणे युट्यूबवर असंख्य लोकांनी पाहिले आहे. आपल्या गाण्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या शकीरावर मात्र आता कर चोरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. स्पेनच्या वकीलाने शकीरावर तब्बल १४. ५ दशलक्ष युरोचा (सुमारे ११८ कोटी रूपये) कर बुडवल्याचा आरोप ठेवला आहे. 

शकीरा २०१५ मध्ये बहामासमधून स्पेनच्या बर्सिलोनामध्ये स्थायिक झाली होती. वकीलांच्या दाव्यानुसार, शकीरा २०१२ ते २०१४ मध्ये स्पेनमध्ये वास्तव्यास होती. या दोन वर्षांतील आयकर तिने स्पेनमध्ये भरायला हवा.

अद्याप शकीराने यासंदर्भात आपली बाजू मांडलेली नाही. पण तिच्या एका जवळच्या सूत्राने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. त्या काळात शकिरा स्पेनमध्ये वास्तव्यास नसल्याचे म्हटले आहे.

याउलट वकीलांच्या दाव्यानुसार, २०१२ ते २०१४ या काळात शकीरा तिचा पार्टनर  फुटबॉलपटू गेरार्ड पिक याच्यासोबत स्पेनमध्ये होती. तर काही कामासाठीच ती अधूनमधून स्पेनबाहेर गेली होती. आता पुराव्यानंतरच या प्रकरणातील खरे तथ्य समोर येणार आहे. स्पेनच्या नियमानुसार,  जो व्यक्ती देशात ६ महिने ते १ वर्षांपासून राहतो; त्याला कर द्यावाच लागतो. 

Back to top button