कलम ३७० हटवून मोदींनी चूक सुधारली  | पुढारी

कलम ३७० हटवून मोदींनी चूक सुधारली 

लंडन : वृत्तसंस्था 

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्याने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. कलम 370 ही एक चूक होती आणि ते हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही चूक सुधारली आहे, असे मत अ‍ॅड. हरीश साळवे यांनी व्यक्त केले आहे. 

ते म्हणाले, कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान ज्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहे त्यावरून ते दिवाळखोर झाले आहेत, असे वाटत आहे. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, यात अजिबात शंका नाही. पाकव्याप्त काश्मीरदेखील भारताचाच भाग आहे आणि पाकिस्तानने या परिसरात अशांतता पसरवली आहे. जर काश्मीरबाबत काही वादग्रस्त असेल तर तो केवळ आणि केवळ पाकव्याप्त काश्मीरचा भाग आहे. केवळ भारताचेच संविधान नाही तर काश्मीरचे संविधानही हे मान्य करते की, काश्मीर भारताचाच अविभाज्य भाग आहे. 

ते म्हणाले, कलम 370 हटविण्याबाबत मी खूप काळापासून सांगत आलो आहे. काही ठिकाणी अचानकपणे निर्णय घेतले जातात. कलम 370 ज्या प्रकारे हटवले गेले ते अगदी बरोबरच होते. हे कलम हटविण्याचा केवळ हाच योग्य मार्ग होता. अनेक लोक म्हणताहेत ही कलम हटविण्याआधी चर्चा व्हायला हवी होती. मात्र, तो मूर्खपणा ठरला असता. कारण केवळ याचा उल्लेख झाला तरी खूप दंगा होतो, टीका केली जाते. त्यामुळे भारत सरकारने अगदी योग्य पाऊल उचलले. सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले गेले आहे. जर यात काही चूक असेल तर सर्वोच्च न्यायालय सांगेल. मला तरी यात काही चूक दिसत नाही. 

हरीश साळवे यांनी पाकिस्तानात कैद भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडली आहे. त्यासाठी त्यांनी केवळ 1 रुपये फी घेतली होती. 

Back to top button