चीनमध्ये महापुराचे मोठे संकट | पुढारी

बीजिंग : वृत्तसंस्था 

जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरवलेला चीन आता महापुराच्या संकटाने हैराण झाला आहे. गेल्या सहा दशकांतील सर्वाधिक पाऊस चीनमध्ये झाला असून, त्यामुळे अनेक शहरे जलमय झाली आहेत. पावसामुळे आतापर्यंत 140 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता आहेत. महापुरामुळे चीनचे आतापर्यंत 8 अब्ज डॉलरहून अधिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. 

नागरिकांना रस्त्यावरून बोट घेऊन बाहेर पडावे लागत आहे. रस्त्यावरील कार पूर्णतः पाण्यात बुडल्या आहेत. 1961 नंतर यंदाचा पाऊस सर्वाधिक आहे. कोरोनामुळे येथील सर्वात मोठे मटण मार्केट आधीपासूनच बंद आहे. त्याशिवाय अनेक पर्यटनस्थळे बंद आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. 433 नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. मोठी सरोवरेही भरून वाहत आहेत. दरम्यान, पाऊस थांबण्याची चिन्हे नसून, हवामान विभागाने या संपूर्ण आठवड्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे. चीनच्या आपत्कालीन मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत 141 नागरिक बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे. तसेच, 28 हजार घरांचे नुकसान झाले आहे. 

वुहान, हुबेईत महापूर 

जूनपासून चीनमध्ये सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरू आहे. त्यामुळे चीनमधील आणि आशियातील सर्वात लांब यांगत्से नदीला पूर आला आहे. यांगत्से नदी हुबेई प्रांतातूनही वाहते. वुहान याच प्रांताची राजधानी आहे. येथूनच कोरोनाची सुरुवात झाली होती. स्थानिक माहितीनुसार महापुराचा मोठा फटका हुबेईला बसला असून, येथे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यांगत्से नदी किनारी अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news