२६/११ हल्ल्यात सहभागाची पाकची कबुली | पुढारी

२६/११ हल्ल्यात सहभागाची पाकची कबुली

इस्लामाबाद : वृत्तसंस्था

मुंबईवर झालेल्या 26/11 या भीषण दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले व हा हल्ला घडवून आणणारे मिळून 11 जण हे पाकिस्तानचे नागरिक आहेत. ते लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असल्याची खळबळजनक कबुली पाकिस्तानच्या केंद्रीय तपास यंत्रणेने पहिल्यांदाच दिली आहे.

मुंबई हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना ‘मोस्ट वाँटेड’ यादीत टाकण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानने त्यांच्या देशातील हजाराहून अधिक दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. लष्कर-ए-तोयबाने हस्तकांकरवी मुंबईत रेकी करवली. पाकिस्तानच्या या ‘मोस्ट वाँटेड’ यादीत मात्र लष्कर- ए-तोयबाच्या म्होरक्यांचा समावेश टाळण्यात आलेला आहे. त्यामुळे ही यादी अपूर्ण असून, आंतरराष्ट्रीय समुदायाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचाच पाकिस्तानने केलेला एक प्रकार आहे, असे म्हटले जात आहे.

मुंबईवर हल्ल्यासाठी दहशतवादी समुद्र मार्गाने भारतात आले होते, त्या सर्वांसाठी बोट खरेदी करणे, अन्य साहित्य खरेदी करणे, शस्त्रांची तजवीज करणे, त्यांच्या प्रवासासाठी सुरक्षित मार्ग तयार करणे, अशी सगळी तयारी या 11 जणांनी केली होती.

 

Back to top button