एकवेळ आम्ही टेस्ला कंपनी बंद करू, पण... : मस्क

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
चीन काय किंवा अन्य कोणत्याही देशात काय, आमच्या कारचा हेरगिरीसाठी गैरवापर होणार असेल तर आम्ही आमची कंपनी एकवेळ बंद करू, पण हेे घडू देणार नाही, असे विधान टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलन मस्क यांनी केले आहे.
चीनमधील सरकारी अधिकारी, लष्करी अधिकारी तसेच ‘व्हीआयपीं’नी टेस्लाच्या कारचा वापर करण्यावर चीनमधील कम्युनिस्ट सरकारने बंदी घातल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात आले होते. या गाड्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चीनमधील गोपनिय माहिती अमेरिकेला पाठवली जात असल्याचा दावा ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या येथील दैनिकाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत केला होता. या पार्श्वभूमीवर मस्क यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. टेहळणी अथवा हेरगिरीसारख्या घटनांमध्ये माझी कंपनी कधीच सहभागी होणार नाही. कोणत्याही देशाची संवेदनशील माहिती ही गोपनियच राहिली पाहिजे, यावर आमची मूल्य म्हणून निष्ठा आहे, असेही मस्क यांनी स्पष्ट केले आहे.