पुढारी ऑनलाईन :
पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान भागात एक भीषण अपघात समोर आला आहे. या भागात प्रवाशांनी भरलेली बस सिंधु नदीत कोसळली. या बसमधील सर्व प्रवाशी एका लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी चालले होते. या ठिकाणाहून आतापर्यंत १६ लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
'डॉन' वृत्तपत्रातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ज्या बससोबत हा अपघात घडला ती बस एस्टोरहून पंजबामच्या चकवाल जिल्ह्याकडे निघाली होती. या दरम्यानच्या रस्त्यातील तेलची पुलावरून ही बस सिंधू नदीत कोसळली. या अपघातात जवळपास १६ लोकांचा मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झालेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसमधील प्रवासी हे एका लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी चालले होते. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरच्या डोंगराळ भागातील गिलगिट-बाल्टिस्तान भागात हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले. बसमधून प्रवास करणाऱ्या ईतर लोकांचा शोध घेतला जात आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.