दुबई : पुढारी ऑनलाईन
वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी मोबाईल ॲप्लिकेशन बनवून अफाट बुद्धिमतेची छाप सोडणाऱ्या केरळच्या आदित्यनने आणखी एक अचाट कामगिरी करत शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आदित्यनने वयाच्या १३ व्या वर्षी कंपनी एका स्पॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीचा मालक होऊन सर्वांनाच आचंबित केले आहे. आदित्यन हा भारतीय असून सध्या दुबईत वास्तव्यास आहे. आदित्यनचा जन्म केरळमधील थिरूविला येथे झाला.
आदित्यन पाच वर्षाचा असतानाच त्याचे कुटुंबियांनी नोकरीसाठी दुबई गाठली. आता तेरा वर्षाच्या आदित्यनची कंपनी लोकांसाठी वेबसाइट बनवण्याचे काम करते. दुबईमधील खलीज टाइम्सने आदित्यनच्या कामगिरीची दखल घेतली आहे. आदित्यनने पाच वर्षाचा असल्यापासूनच संगणक वापर करण्यास सुरुवात केली. तंत्रज्ञान क्षेत्रातील या मास्टरने १३ व्या वर्षी स्वत:ची 'ट्रिनेट सोल्यूशन्स' या नावाची कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीत सध्या केवळ तीन कर्मचारी काम करत आहेत. विशेष म्हणजे ते कर्मचारी आदित्यनचे शाळेतील मित्र आहेत.
आदित्यनने आपल्या कंपनी स्थापन करण्याविषयी तसेच तंत्रज्ञानातीला आवडीविषयी माहिती देताना सांगितले की, नवव्या वर्षापासूनच कंटाळा घालविण्यासाठी मी पहिल्यांदा मोबाईल ॲपची निर्मिती केली. तेव्हापासून मी लोकांसाठी वेबसाईट डिझाईन करण्याचे काम करत आहे. तसेच तो पुढे म्हणाला की, मला कंपनी प्रस्थापित करण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण करावी लागतील. आतापर्यंत १२ पेक्षा जास्त लोकांसोबत काम केले आहे. त्यांच्यासाठी डिझाईन आणि कोंडिग सेवा मोफत दिली आहे.