IND vs ZIM : दुसऱ्या वनडेत भारताचा दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

IND vs ZIM : दुसऱ्या वनडेत भारताचा दणदणीत विजय, मालिकेत आघाडी
Published on
Updated on

हरारे ; वृत्तसंस्था : उत्तम गोलंदाजी अन् फलंदाजांच्या योगदानाच्या जोरावर भारतीय संघाने दुसर्‍या वन-डे (IND vs ZIM) सामन्यातही झिम्बाब्वेला नमवले. भारतीय संघाने 5 विकेटस् राखून विजय मिळवताना मालिकेतही 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. शार्दूल ठाकूरने मिळालेल्या संधीचे सोने करताना 3 विकेटस् घेतल्या.

पहिल्या वन-डेत झिम्बाब्वेने 189 धावा केल्या होत्या; परंतु आज त्यापेक्षाही कमी धावा झाल्या. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 161 धावांत माघारी परतला. याचे प्रत्युत्तर देताना सलामीला आलेला कर्णधार के. एल. राहुल 1 धावा करून माघारी परतला. शिखर धवन, शुभमन गिल, संजू सॅमसन व दीपक हुडा यांनी चांगली फलंदाजी करून संघाचा विजय पक्का केला. ईशान किशनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तोही बर्‍याच दिवसांनी मैदानावर उतरला होता; पण तो 6 धावांवर बाद झाला. गिलसह त्याने 34 धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन व दीपक हुडा यांनी 56 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. हुडा 25 धावांवर बाद झाला. संजूने षटकार खेचून भारताचा 5 विकेटस् राखून विजय पक्का केला. त्याने 39 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 43 धावा केल्या.

तत्पूर्वी, झिम्बाब्वेने दुसर्‍या वन-डे सामन्यातही भारतीय गोलंदाजांसमोर पुन्हा गुडघे टेकले. दीपक चहरच्या जागी आज प्लेईंग इलेव्हनमध्ये आलेल्या शार्दूल ठाकूरने एकाच षटकात दोन विकेट घेत गेम चेंज केला. झिम्बाब्वेची कैटानो व इनोसेंट काईया ही जोडी सलामीला आली. त्यांनी 8.4 षटकांत 20 धावा केल्या. मोहम्मद सिराजने पहिला धक्का देताना कैटानोला (7) बाद केले. संजूने यष्टींमागे कैटानोचा सुरेख झेल घेतला. त्यानंतर शार्दूलने 12 व्या षटकाच्या पहिल्या व शेवटच्या चेंडूंवर विकेटस् घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाने चौथा धक्का देताना झिम्बाब्वेची अवस्था 4 बाद 31 अशी केली होती. झिम्बाब्वेने 10 चेंडूंत तीन विकेटस् गमावल्या. (IND vs ZIM)

सिकंदर रजा व सीन विलियम्स या जोडीने 50 चेंडूंत 41 धावा जोडल्या. कुलदीप यादवने ही भागीदारी तोडली. रजा 31 चेंडूंत 16 धावांवर माघारी परतला. झिम्बाब्वेचा निम्मा संघ 75 धावांत तंबूत परतला. दीपक हुडाने विलियम्सची विकेट घेत झिम्बाब्वेला धक्का दिला. विलियम्स 42 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह 42 धावांवर माघारी परतला. अक्षर पटेलने ब्रॅड ईव्हान्सला (9) माघारी पाठवले. व्हिक्टर एनयाऊची भोपळ्यावर रनआऊट झाला. बर्ल 39 धावांवर नाबाद राहिला. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 161 धावांत माघारी परतला.

सामना कॅन्सरग्रस्त मुलांना समर्पित

दुसर्‍या वन-डे सामन्यापूर्वी झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या एका निर्णयामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने दुसरा सामना झिम्बाब्वेमधील कॅन्सरग्रस्त लहान मुलांसाठी समर्पित केला आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने ट्विट करून याची माहिती दिली आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने ट्विट केले की, झिम्बाब्वे क्रिकेटने भारताविरुद्धचा दुसरा वन-डे सामना देशातील कॅन्सरग्रस्त लहान मुलांसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम किडज्कॅनमार्फत केले जाईल. आम्ही त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आजच्या सामन्यात नारंगी रंगाचे किट वापरणार आहोत. याचबरोबर त्यांनी No Child Should Be Left Behind हा हॅशटॅगही वापरला.

पहिल्या सामन्याचा मॅचविनर, दुसर्‍या सामन्यात बाहेर

आयपीएल 2022 अन् त्यानंतर झालेल्या आंतरराष्ट्रीय मालिकांना मुकलेल्या दीपक चहरने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वन-डेतून पुनरागमन केले. जवळपास 6 महिन्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार्‍या दीपकने तीन विकेटस् घेत 'मॅन ऑफ दि मॅच' पुरस्कारही पटकावला; पण आज सुरू असलेल्या दुसर्‍या वन-डे सामन्यात त्याला बाकावर बसवण्यात आले. मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे आणि पाठीच्या दुखण्यामुळे तो 6 महिने क्रिकेटपासून दूर होता. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, दीपक चहरला किरकोळ दुखापत झाली आहे. 'बीसीसीआय'ने अद्याप याबाबत काहीच अधिकृत माहिती दिलेली नाही; पण आगामी आशिया चषक व टी-20 वर्ल्डकप डोळ्यांसमोर ठेवून दीपक चहरच्या फिटनेसबाबत धोका पत्करायचा नसल्याने त्याला विश्रांती दिली गेली आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news