

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी २० मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत विजयी सलामी दिली. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इशान किशनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. हा सामना विशाखापटणम येथे खेळवण्यात आला होता.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २०९ धावांचे आव्हान ठेवले. भारताने ऑस्ट्रेलियाचे हे आव्हान शेवटच्या चेंडूवर २ गडी राखून गाठले. भारताकडून सूर्यकुमार यादवने ४२ चेंडूमध्ये ८०, इशान किशन ३९ चेंडूमध्ये ५८ धावा आणि रिंकू सिंगने १४ चेंडूमध्ये २२ धावांचे योगदाने दिले. तर ऑस्ट्रेलियाकडून तन्वीर संघा याने २ तर सियन अॅबॉट, मॅथ्यू शॉर्ट आणि जेसन बेहरनड्रॉपने प्रत्येकी १ विकेट पटकावली.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिशने शानदार शतक झळकावले. त्याने 50 चेंडूत 110 धावा केल्या. यामध्ये त्याने 11 चौकार आणि आठ षटकार मारले. त्याने स्टीव्ह स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली. स्मिथने 52 धावांची खेळी खेळली. टीम डेव्हिडने नाबाद 19 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट 13 धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिसने नाबाद सात धावा केल्या. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तर स्टिव्ह स्मिथ रन-आऊट बाद झाला.