

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : Nagpur Crime Murder : उत्तर नागपुरातील कुख्यात गुंड शेर खान याने आपल्या साथीदाराच्या मदतीने एका तरुणाची हत्या केली. प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडाशी हातमिळवणी केल्याच्या संशयातून शेर खानने मेकॅनिकची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेने नागुपरात एकच खळबळ उडाली आहे.
नागपूरच्या यशोधरा पोलिसांनी सराईत गुन्हेगार शेर खान आणि त्याचा साथीदार फरदीन खान या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. मयत २० वर्षीय तरुण इमरोज उर्फ इम्मू रसीद कुरैशी हा हमीद नगरचा रहिवासी होता.
शेर खानच्या विरुद्ध हत्येसह सात गुन्हे दाखल आहेत. २५ जूनला एमपीडीए संपल्यावर तो तुरुंगातून बाहेर आला होता. मयत इम्मू कुरैशी याच्यासोबत शेर खानची जुनी ओळख होती. तो गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करत होता. इम्मू आपल्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंड माऊजर याला सामील झाल्याचा संशय शेर खानच्या मनात होता. आपल्या हालचालींची माहिती देऊन आपली हत्या करण्याचा कट रचण्यात इम्मू मदत करत आहे, असा शेर खानला संशय होता. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास इम्मू कुरैशी आपला मित्र शादाब अली याच्यासोबत घराच्या समोर फिरत होता. त्याचवेळी शेर खान आणि त्याचा साथीदार फरदीन खान हे दोघे अॅक्टिव्हावरुन आले. शेर खानने इम्मूला सोबत फिरायला येण्याची गळ घातली.
इम्मू शेर खान आणि फरदीन या दोघांच्या सोबत गेला. तिथे शेर खानने इम्मूला धमकावायला सुरुवात केली. दोघांमध्ये वाद सुरु झाला. इतक्यात शेर खानने आपल्या खिशातून चाकू बाहेर काढला आणि त्याने इम्मूच्या गळ्यावर चाकूने वार केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी इम्मू कुरैशी याला रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी शेर खान आणि त्याचा साथीदार फरदीन खान यांना अटक केली आहे. इम्मू कुरैशी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शेर खान हा कुख्यात गुंड आहे. अल्पवयीन असतानाच चार वर्षांपूर्वी त्याने एक हत्या केली होती. परिसरातील इतर काही गुंडांच्या टोळींशी त्याचं वैर आहे.
या घटनेमुळे यशोधरा पोलीस ठाणे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या भागात गेल्या काही काळापासून हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं बोललं जातं.