

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज ( Hyderabad vs Punjab ) यांच्यातील सामन्यात पंजाब किंग्जने १२० चेंडूत १२६ धावा करण्याचे दिलेले आव्हान हैदराबादला पार करता आले नाही. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात हैदराबादला ५ धावांनी पराभव सहन करावा लागला. जेसन होल्डरने २९ चेंडूत नाबाद ४७ धावांची आक्रमक खेळी केली. मात्र ५ षटकारांनी सजलेली ही खेळी हैदराबादची लाज वाचवू शकली नाही.
पंजाबचे १२६ धावांचे आव्हान पार करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. पंजाब किंग्जच्या मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नर ( २ ) आणि केन विल्यमसन ( १ ) यांना स्वस्तात माघारी धाडत हैदराबादला सुरुवातीलाच दोन धक्के दिले.
या धक्यातून सावरण्याच्या प्रयत्नात हैदराबादची धावगती प्रचंड मंदावली. पंजाबच्या गोलंदाजांनी संथ खेळपट्टीचा चांगला वापर करुन घेत हैदराबादला पॉवर प्लेमध्ये फक्त २० धावाच करु दिल्या. हैदराबादची आयपीएलमधील ही पॉवर प्लेमधील आतापर्यंतची निच्चांकी धावसंख्या आहे. पॉवर प्लेनंतर मनीष पांडे आणि वृद्धीमान सहावर धावगती वाढवण्याचे प्रचंड दडपण होते.
याच दडपणात मनीष पांडे १३ धावा करुन बाद झाला. त्याला रवी बिश्नोईने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पांडे नंतर आलेल्या केदार जाधव आणि वृद्धीमान सहाने हैदराबादला १० षटकात ४३ धावांपर्यंत पोहचवले. ही जोडी हैदराबादची गाडी रुळावर आणणार असे वाटत असतानाच रवी बिश्नोईने १२ चेेडूत १२ धावा करणाऱ्या केदारला बाद केले. त्यानंतर त्याच षटकात अब्दुल समादला बाद करुन त्याने हैदराबादचा निम्मा संघ ६० धावात माघारी धाडला.
या वातहतीनंतर अखेर हैदराबादसाठी जेसन होल्डर उभा राहिला. त्याने आक्रमक फटके मारत संघाला १६ षटकात ९१ धावांपर्यंत पोहचवले. त्यामुळे हैदराबादसमोरचे आव्हान २४ चेंडूत ३५ धावा असे आवाक्यात आले. मात्र तोपर्यंत ३६ चेंडूत ३० धावा करणारा वृद्धीमान सहा धावबाद झाला. सहा बाद झाल्यानंतर राशिद खान मैदानावर आला.
दरम्यान, होल्डरने आपला आक्रमक बाणा कायम ठेवत झपाट्याने चेंडू आणि धावांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने चांगली साथ मिळत नव्हती. आता राशिद खानही ३ धावा करुन माघारी फिरला होता. राशिद बाद झाल्यानंतर आलेल्या भुवनेश्वर आणि होल्डरने सामना ६ चेंडूत १७ धावा असा आणला.
अखेर पंजाबने ५ धावांनी सामना जिंकत ८ गुणांसह पाचव्या स्थानावर उडी घेतली. पंजाबकडून बिश्नोईने ३ तर शमीने २ विकेट घेत टिच्चून मारा केला. होल्डरने अखेरपर्यंत झुंज देत २९ चेंडूत नाबाद ४७ धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज ( Hyderabad vs Punjab ) यांच्यातील सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा कर्णधार केएल. राहुलने डावाची सुरुवात आक्रमक करण्याचा प्रयत्न केला. मात्र जेसन होल्डरने सामन्याच्या चौथ्या षटकात २१ धावा करणाऱ्या राहुलला आणि ५ धावा करणाऱ्या मयांक अग्रवालला पाठोपाठ बाद केले.
दोन्ही सलामीवीर एकाच षटकात माघारी गेल्यानंतर आलेल्या ख्रिस गेल आणि मार्करमने सावध फलंदाजी करण्यास सुरुवात केली. पण. जम बसल्यानंतर या दोघांनी आक्रमक फटके मारण्यास सुरुवात केली. त्यांनी संघाला १० षटकात अर्धशतक पार करुन दिले. मात्र त्यानंतर राशिद खानने गेलला १४ धावांवर बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. त्यानंतर आलेला निकोलस पूरन देखील ८ धावांची भर घालून माघारी गेला.
त्यानंतर सेट झालेला मार्करमही २७ धावांची खेळी करुन बाद झाला. त्याला अब्दुल समादने बाद केले. मार्करम बाद झाल्यानंतर धावा करण्याची जबाबदारी आलेला दीपक हुड्डा देखील १३ धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला होल्डरने बाद केले. होल्डरचा हा तिसरा बळी होता.
हुड्डा बाद झाल्यानंतर पंजाबने कसेबसे आपले शतक पूर्ण केले. अखेर पंजाब किंग्जने भुवनेश्वर टाकत असलेल्या अखेरच्या षटकात १४ धावा करत २० षटकात ७ फलंदाजांच्या मोबदल्यात १२५ धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून होल्डरने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.