

कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा : दीर्घ आजाराने माजी मंत्री रजनीताई सातव (वय ७६) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (दि. १९) दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठवाडा, विदर्भातील राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आदीसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. Rajnitai Satav
दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या अकस्मात निधनानंतर त्या पुर्णतः खचून गेल्या होत्या. दीर्घ आजाराने ग्रस्त रजनीताई यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी नांदेड येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे जिल्ह्यात शोककळा पसरली. आज त्यांच्या निवासस्थान कोहिनूर येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. हजारो कार्यकर्ते, नागरिक व महिलांनी अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती. रजनीताई यांच्या पश्चात सून आमदार प्रज्ञा सातव, नातवंडे पुष्कराज व तितली असा परिवार आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांचे त्या आई होत. Rajnitai Satav
यावेळी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, शासकीय अधिकारी हजर होते. तर अंतिम संस्कारवेळी खा. हेमंत पाटील, आ माधवराव पाटील जवळगावकर, माजी मंत्री सुर्यकांता पाटिल, माजी खा. अॅड. शिवाजी माने, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री माधव किन्हाळकर, भाऊराव पाटील, विजय खडसे, नागेश पाटील आष्टीकर, संतोष टार्फे, शेतकरी नेते अजित मगर, काँग्रेस प्रदेश सचिव बाळासाहेब देशमुख, प्रीती जैस्वाल, नेते सचिन नाईक, प्रकाश देवसरकर, राजेंद्र केशवे, जकी कुरेशी, शेख सलीम, सुरेश सराफ, बाबाराव नाईक, सुरेश देशमुख, साहेबराव कांबळे, मुनिर पटेल, नेहाल भय्या, वंचितचे डॉ. बी. डी. चव्हाण, डॉ. दिलीप मस्के, भाजपचे श्रीकांत पाटील, बी. डी. बांगर, शिवशंकर घुगे, शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख गोपु पाटील, राष्ट्रवादीचे दिलीप चव्हाण, जग्गु खुराणा, अॅड. सतीश देशमुख, अॅड. मनीष साकले, आदीसह सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, कळमनुरी मतदारसंघातील नागरिक व महिलांनी उपस्थिती लावली होती.
हेही वाचा