

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा : शहरातील जलेश्वर तलावाच्या परिसरात उर्वरीत अतिक्रमण काढून घेण्याबाबत सुचना देण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर नागरिकांनी दगडफेक केली. ही घटना आज (दि.१७) दुपारी एक वाजता घडली. यामध्ये पालिकेचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून पोलीस वाहनाच्या काचा फुटून नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
जलेश्वर तलावाच्या दुसऱ्या बाजुला असलेले सुमारे ३० पेक्षा अधिक अतिक्रमण धारकांचेही अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यासाठी शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पालिकेचे कर्मचारी बाळू बांगर, पंडीत मस्के, रवी दरक, माधव सुकटे, दिनेश वर्मा, सुनील देवकर यांच्यासह पोलिसांचे पथक त्या भागात गेले होते. यावेळी पालिकेचे कर्मचारी मस्के यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे अतिक्रमधारकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देत होते.
शहरातील जलेश्वर तलावाच्या परिसरात असलेले १९५ नागरिकांचे अतिक्रमण शुक्रवारी महसूल प्रशासनाने हटविले. यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, तहसीलदार नागनाथ वागवाड, पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सायंकाळी उशिरापर्यंत सदर अतिक्रमण काढण्यात आले. दरम्यान, तलावाच्या दुसऱ्या बाजूला असलेले सुमारे ३० पेक्षा अधिक अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
त्यासाठी आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पालिकेचे कर्मचारी बाळू बांगर, पंडीत मस्के, रवी दरक, माधव सुकटे, दिनेश वर्मा, सुनील देवकर यांच्यासह पोलिसांचे पथक त्या भागात गेले होते.
यावेळी पालिकेचे कर्मचारी मस्के यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे अतिक्रमधारकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सुचना देत होते. यावेळी अचानक जमाव पोलीस वाहन व कर्मचाऱ्यांसमोर आला. त्यांनी दगडफेक करण्यास सुरवात केली. या दगडफेकीत पंडीत मस्के यांच्या डोक्याला दगड लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानतंर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
हेही वाचलंत का ?